Accused arrested in Dhule murder case | धुळ्यात वृद्धाच्या खूनप्रकरणी आरोपीस अटक

धुळ्यात वृद्धाच्या खूनप्रकरणी आरोपीस अटक

धुळे : लॉकडाऊन असल्याने दुकानातील साहित्य देण्यास नकार देणाऱ्या शिक्षकाच्या वडिलांना मारहाण करत, त्यांचा खून करण्यात आल्याची घटना साक्री रोडवरील कुमारनगरात रविवारी रात्री घडली. शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, पथकाने धाव घेत संशयिताला रात्रीच ताब्यात घेतले. दरम्यान, वडिलांना वाचवायला आलेल्या शिक्षकालाही मारहाण करण्यात आली.

नवीन वासुदेव दर्यानानी (३५) यांचे साक्री रोडवरील कुमारनगर येथील शिवधाम मंदिराजवळ घर आहे. तेथेच त्यांचे वडील वासुदेव नारायणदास दर्यानानी (७६) यांचे दुकान आहे. मनोज ताराचंद तुलसानी (रा.कुमारनगर, साक्री रोड, धुळे) हा काही साहित्य घेण्यासाठी त्यांच्या दुकानात आला, पण लॉकडाऊनमुळे दुकान उघडून साहित्य देण्यास वासदेव दर्यानानी यांनी नकार दिला. त्याचा राग येऊन मनोज याने वासुदेव दर्यानानी यांना शिवीगाळ करीत हाताबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी त्यांच्या छातीला, पोटाला, पाठीला आणि अन्य ठिकाणी जबर मारहाण केल्याने दुखापत झाली. यावेळी शिक्षक नवीन दर्यानानी हे वाद मिटविण्यासाठी आले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. जखमी अवस्थेत वासुदेव दर्यानानी यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

शहर पोलिसांना घटनेची माहिती कळताच, पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेतील संशयित मनोज ताराचंद तुलसानी याला रात्रीच ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात मयत वासुदेव दर्यानानी यांचा मुलगा नवीन याने फिर्याद दाखल केल्याने भादंवि कलम ३०२, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: Accused arrested in Dhule murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.