विद्यार्थी संख्येनुसार धुळे जिल्ह्यातील जि.प.शाळांना गणवेशाचा निधी द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 11:19 IST2019-08-09T11:18:49+5:302019-08-09T11:19:36+5:30
महाराष्टÑ पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी

विद्यार्थी संख्येनुसार धुळे जिल्ह्यातील जि.प.शाळांना गणवेशाचा निधी द्यावा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांना विद्यार्थी संख्येनुसार गणवेशाची रक्कम वितरीत करण्यात यावी, अशी मागणी महाराष्टÑ पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, २०१८- १९ पासून शाळांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत निधी मिळतो. २०१७-१८ पर्यंतचा शाळा स्तरावरील सर्व शिल्लक निधी ३१ मार्च १९ पूर्वी खर्च करावा असे कळविल्याने, शाळांनी कार्यवाही केली. मात्र २०१९-२० या वर्षाकरिता संयुक्त शाळा अनुदानांतर्गत कोणतेही अनुदान शाळेला मिळालेले नाही. चालू सत्रातील अनुदान एप्रिलमध्ये प्राप्त होत नसल्याने, शाळा आधीच्या सत्रात प्राप्त अनुदान हे चालू सत्राच्या संभाव्य खर्चाकरीता शिल्लक ठेवते. शाळेचा खर्च हा सन २०१८-१९ मध्ये प्राप्त संयुक्त शाळा अनुदानातील शिल्लक रकमेतून शाळा करीत आहे. परंतु जि.प.अंतर्गत विद्यार्थ्यांना देय गणवेश निधी वितरीत करतांना संयुक्त शाळा अनुदान प्राप्त रक्कम कपात करून देण्यात आला.
त्यामुळे बॅँकेतील शिल्लक रक्कम शुन्य होत असल्याने बॅँक खाते सुरू ठेवण्यात अडचण येत आहे. प्राप्त संयुक्त शाळा अनुदान या सत्राच्या सुरवातीला खर्च करू नये अशा कुठल्याही सूचना नव्हत्या.त्यामुळे अनेक शाळांनी सत्राच्या सुरवातीलाच रक्म खर्च केल्याने गणवेश निधीकरिता समायोजित केलेल्या रकमेत तफावत निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत शाळास्तरावर खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध नाही.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळेला मिळणारा गणवेश निधी हा अनेक शाळेत विद्यार्थी संख्येपेक्षा कमी उपलब्ध झालेला आहे. तो विद्यार्थी संख्येनुसार मिळावा, शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेलाच व्हावे अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे, जिल्हा सरचिटणीस भुपेश वाघ, विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, सचिव रवींद्र देवरे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, तालुकाध्यक्ष दिलीप वाडेकर, खुशाल चित्ते, संजय ठाकूर आदी उपस्थित होते.