५० हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकास रंगेहात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:40 IST2019-06-07T21:40:13+5:302019-06-07T21:40:38+5:30
धुळ्यात कारवाई : वार ग्रा.पं.ला दिलेल्या अनामत रकमेसाठी मागणी

५० हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकास रंगेहात पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सरपंच म्हणून तालुक्यातील वार ग्रामपंचायतीत सरपंच असताना विकासकामासाठी दिलेली दीड लाख रुपये अनामत रक्कम परत देण्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारताना तालुक्यातील वार येथील ग्रामसेवक राजाराम बारकू सांगळे (४३) याला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार हे २००८ ते २०१२ पर्यंत वार ग्रा.पं.मध्ये सरपंच म्हणून कार्यरत होते. २०११-१२ मध्ये विकास कामासाठी तक्रारदार यांनी १ लाख ४८ हजार रुपये अनामत रक्कम म्हणून दिले होते. ती रक्कम परत मिळावी, यासाठी त्यांनी वेळोवेळी अर्ज केले. परंतु रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी येथील गटविकास अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून रक्कम न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. त्यामुळे गटविकास अधिकाºयांनी वार सरपंच व ग्रामसेवक यांना त्यांची रक्कम परत देण्याबाबत पत्र दिले. तक्रारदार ग्रामसेवक सांगळे याला भेटले. त्याने अनामत रकमेसाठी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. मात्र त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शुक्रवार ७ रोजी तक्रार केली. त्यानुसार पडताळणी केली असता ग्रामसेवक सांगळे याने लाचेची मागणी केल्याचे प्रत्ययास आले. त्यानुषंगाने सांगळे याने तक्रारदार यांना येथील मालेगाव रोड, रेल्वे क्रॉसिंगजवळील हॉटेल सुपर सम्राट येथे बोलवून ५० हजार रुपये स्वीकारल्याने त्याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर व त्यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल जयंत साळवे, पोलीस नाईक संतोष हिरे, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, शरद काटके, कैलास जोहरे, संदीप सरग, प्रकाश सोनार, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, संदीप कदम, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली.