Dhule Crime ( Marathi News ) : पाळीव कुत्र्यांसोबतची गहिरी दोस्तीच चोरट्याला महागात पडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यासोबत चोरीच्यावेळी असलेल्या पाळीव कुत्र्याच्या फोटोवरुनच प्रभात नगरात झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराचा छडा पोलिसांना लागला आणि त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यातही देवपूर पोलिसांना यश आले.
देवपुरातील प्रभातनगर येथील रहिवासी राम मनोज निकम यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत कपाटामधील व घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह पितळी भांडी, रोकड असा एकूण १ लाख २० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी ९ रोजी सायंकाळी देवपूर पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याच्या तपासाला गती देत शोधपथकाने तपासाची चक्रे फिरवून घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता यामध्ये दोन चोरटे हे घराजवळ उभे होते व त्यांच्यासोबत एक पाळीव कुत्रा होता. त्यात एकाने तोंडाला काळ्या व पांढऱ्या रंगाचे मफलर गुंडाळले होते. तो धागा पकडून कुत्रा पाळणारा सराईत आरोपी कोण आहे, याचा तपास पोलिस रेकॉर्डवरुन लावला असता. तो अट्टल गुन्हेगार हर्षल ऊर्फ सनी चौधरी (रा. विटाभट्टी देवपूर, धुळे) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच त्याला अटक केली. नंतर पोलिसांनी श्वान पथकातील जयला आरोपींनी घटनास्थळी हाताळलेल्या वस्तूंचा वास देण्यात आला.
डॉग हॅण्डलर पोहेकॉ. रोकडे व पाटील यांच्यासह विटाभट्टी येथील एक किलोमीटर अंतरावर परिसरात धावत जाऊन संशयित आरोपी हर्षल चौधरी याच्या घराजवळ नेले. यावेळी घराची झडती घेतली असता काळ्या व पांढऱ्या रंगाचे मफलर मिळून आले. सखोल विचारपूस केली असता, त्याने मित्र जयवंत बापू पाटील (रा. विटाभट्टी देवपूर, धुळे) सोबत चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी जयवंत पाटील यालाही अटक केली. दोघांकडून चोरी केलेला १ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोघांना अटक करुन दोघांविरुद्ध देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.