भरधाव कार दुचाकीला धडकली, दोघे गंभीर
By देवेंद्र पाठक | Updated: June 9, 2024 16:53 IST2024-06-09T16:53:08+5:302024-06-09T16:53:47+5:30
साक्री तालुक्यातील सतमाने फाट्यावरील घटना

भरधाव कार दुचाकीला धडकली, दोघे गंभीर
धुळे : भरधाव वेगाने येणारी कार समोरून येणाऱ्या दुचाकीला जावून धडकली. यात दुचाकीवरील दोघेही दुचाकीसह फेकले गेले. ही घटना २ जून रोजी सतमाने फाट्यावर घडली. दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निजामपूर पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी फरार कारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.
नेताजी नामदेव खंडेकर (वय ३२, रा. सतमाने ता. साक्री) यांनी शनिवारी दुपारी पावणे तीन वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, जीजे ०५ जेएल ४५६१ क्रमांकाची कार भरधाव वेगाने जात असताना समोरून येणारी एमएच १८ बीके १३८३ क्रमांकाच्या दुचाकीला कार जावून धडकली. अपघाताची घटना साक्री तालुक्यातील सतमाने गावाच्या फाट्यावर २ जून रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात नेताजी खंडेकर यांचे मेव्हुणे भगवान तुकाराम हालोर (रा. बळसाणे ता. साक्री) आणि भटू गणपत मासुळे (रा. गोताणे ता. धुळे) या दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याप्रकरणी अपघातानंतर फरार झालेल्या कारचालक विरोधात विविध कलमान्वये शनिवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस नाईक आखाडे करीत आहेत.