पिकअप व्हॅनचालकाला भरदिवसा चौघांनी लुटले; धुळे तालुक्यातील नंदाळे शिवारातील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: March 19, 2023 17:46 IST2023-03-19T17:45:24+5:302023-03-19T17:46:08+5:30
धुळे तालुक्यातील पिकअप व्हॅनचालकाला भरदिवसा चौघांनी लुटले.

पिकअप व्हॅनचालकाला भरदिवसा चौघांनी लुटले; धुळे तालुक्यातील नंदाळे शिवारातील घटना
धुळे : तालुक्यातील नंदाळे गावाजवळ पिकअप व्हॅन चालकाला भरदिवसा अडवून मारहाण करत त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५० हजाराचा मुद्देमाल घेऊन चौघांनी धूम ठोकली. ही घटना शनिवारी सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रविवारी पहाटेच्या सुमारास चार अनोळखी तरुणांविराेधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.
धुळे तालुक्यातील हेंकळवाडी येथील समाधान ब्रिजलाल पाटील (वय २७) हा एमएच ४६ बीबी ९६७० क्रमांकाची पिकअप व्हॅन घेऊन धुळे तालुक्यातील नवलनगरकडून आंबोडे गाव मार्गे नंदाळे गावी जात होता. या दरम्यान एका डोंगराजवळ २५ ते ३५ वयोगटाचे ४ तरुणांनी त्याला रस्त्यात अडविले. शिवीगाळ करीत मारहाण केली. त्याच्याजवळ असलेली ४० हजार रुपये किमतीची १ तोळे वजनाची सोन्याची चेन आणि १० हजार रुपये रोख असा एकूण ५० हजाराचा ऐवज घेऊन चौघांनी पोबारा केला.
ही घटना शनिवारी सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली. यात घाबरलेल्या पिकअप चालकाने रुग्णालयात उपचार घेतला. त्यानंतर त्याने धुळे तालुका पोलिस ठाणे गाठत आपबीती कथन केली. याप्रकरणी चार अनोळखी तरुणांविरोधात भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहेत.