दुचाकीत साडीचा पदर अडकून पडल्याने विवाहिता ठार
By अतुल जोशी | Updated: April 5, 2023 15:34 IST2023-04-05T15:34:16+5:302023-04-05T15:34:39+5:30
पाच महिन्यांचे बाळ मात्र सुखरूप, अकस्मात मृत्यूची नोंद

दुचाकीत साडीचा पदर अडकून पडल्याने विवाहिता ठार
धुळे : पती व पाच महिन्यांच्या बाळासह दुचाकीने माहेरी जात असलेल्या विवाहितेचा साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकून पडल्याने, विवाहिता ठार झाली, तर बाळाला कुठलीही दुखापत झाली नाही. हा अपघात ३ रोजी झंझाळे- घोडदे रस्त्यावर झाला. रूपाली रामू बोरसे (वय २२ वर्षे) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
रूपाली बोरसे ही पती व पाच महिन्यांच्या बाळासह माहेरी घोडदे येथे जात होती. वाटेत झंझाळे फाट्याजवळ विवाहितेचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकल्याने, ती पडली. तिच्या डोक्याला जबर मार लागला. पतीने तिला तत्काळ उपचारासाठी पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारार्थ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉ. अरुणकुमार नागे यांनी विवाहितेला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात ४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक पाटील करीत आहेत.