हिरे महाविद्यालयातील प्रयोगशाळेत झाल्या ९५ हजार कोरोना चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:35 IST2021-02-13T04:35:18+5:302021-02-13T04:35:18+5:30
धुळे - येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना प्रयोगशाळेत आतापर्यंत ९५ हजार ५२६ कोरोना चाचण्यांची तपासणी करण्यात आली ...

हिरे महाविद्यालयातील प्रयोगशाळेत झाल्या ९५ हजार कोरोना चाचण्या
धुळे - येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना प्रयोगशाळेत आतापर्यंत ९५ हजार ५२६ कोरोना चाचण्यांची तपासणी करण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात २९ मार्चला कोरोना प्रयोगशाळा सुरू करण्यात आली होती. उत्तर महाराष्ट्रातील ही कोरोनाची पहिली प्रयोगशाळा होती. धुळ्यासोबतच जळगाव, नाशिक व नंदुरबार येथील नागरिकांच्या स्वॅबची तपासणी या प्रयोगशाळेत करण्यात आली आहे.
मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम विदेशातून आलेले नागरिक कोरोना चाचणी करण्यासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात येत होते. मात्र, तोपर्यंत कोरोना चाचणी फक्त पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था याठिकाणीच केली जात होती. त्यामुळे हिरे महाविद्यालयात दाखल झालेल्या रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठवले जात होते. राज्यभरातून येणाऱ्या स्वॅबची संख्या वाढल्यामुळे राष्ट्रीय विषाणू संस्थेतून चाचणीचा अहवाल येण्यास तीन ते चार दिवस लागत होते. त्यानंतर, राज्यात आणखी सहा ठिकाणी कोरोना प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यात हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना प्रयोगशाळेचा समावेश होता. ही उत्तर महाराष्ट्रात सुरू झालेली पहिली प्रयोगशाळा होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जळगाव, नाशिक व नंदुरबार येथेही कोरोना प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. या प्रयोगशाळेत आतापर्यंत एकूण ९५ हजार ५२६ कोरोना चाचण्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात, धुळे जिल्ह्यातील सर्वाधिक ८१ हजार २६ चाचण्या झाल्या आहेत. तर, जळगाव येथील पाच हजार २००, नंदुरबार चार हजार ५०० व नाशिक येथील चार हजार ८०० चाचण्या याठिकाणी करण्यात आल्या आहेत.
महिलांनी सांभाळली धुरा - कोरोना प्रयोगशाळेच्या प्रमुखपदाची जबाबदारी आतापर्यंत दोन महिलांनी समर्थपणे सांभाळली आहे. प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर डॉ. मृदुला द्रविड या प्रमुख होत्या. त्यानंतर, त्या निवृत्त झाल्यानंतर डॉ. माधुरी सूर्यवंशी यांनी जबाबदारी सांभाळली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता, त्यावेळी २४ तास प्रयोगशाळेचे काम सुरू राहत होते.
एका रिपोर्टमध्ये झाला होता गोंधळ -
* मालेगाव येथील रुग्णाच्या रिपोर्टमध्ये गोंधळ झाल्याचा प्रकार घडला होता. त्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह सांगण्यात आला होता. चूक लक्षात आल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. नोंदणी करताना चूक झाल्याने हा प्रकार झाल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. त्यानंतर मात्र एकाही अहवालात चूक झाली नाही.
लॅबचे पुढे काय -
जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच कोरोना चाचण्यांची संख्याही घटली आहे. त्यामुळे प्रयोगशाळेवरील ताण सध्या कमी झाला आहे. कोरोनाच्या चाचण्या कमी झाल्या किंवा बंद झाल्या, तर प्रयोगशाळेत डेंग्यू, चिकनगुनिया व हिपॅटेटीस बी आदी आजारांच्या चाचण्या करण्यात येतील, असे डॉ. माधुरी सूर्यवंशी यांनी सांगितले.
सहा जणांचा स्टाफ -
सध्या प्रयोगशाळेत केवळ सहा जण कार्यरत आहेत. त्यात तीन तंत्रज्ञ, दोन प्राध्यापक व एक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. चाचण्यांची संख्या जास्त असताना इतर विभागांतील तंत्रज्ञांची मदत घेण्यात आली होती.
शासनाकडून मिळते साहित्य -
कोरोना प्रयोगशाळेसाठी शासनाकडून थेट निधी दिला जात नाही. मात्र, आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. कोरोना चाचण्या करण्यासाठी लागणारे किट व इतर साहित्य उपलब्ध करून दिले जाते. सध्या प्रयोगशाळेत पुरेसे किट उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. निधीची कोणतीही अडचण नसली, तरी कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. सध्या केवळ सहा कर्मचारी कोरोना प्रयोगशाळेचा गाडा हाकत आहेत. तंत्रज्ञ व अन्य पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढली, तेव्हा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आली होती.