पेन्शन परतीच्या नोटिशीला ८ हजार ३०९ शेतकऱ्यांचा ठेंगा!अडीच कोटी वसूल : ५ कोटी २७ लाखांची वसुली बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST2021-06-02T04:27:11+5:302021-06-02T04:27:11+5:30
धुळे जिल्ह्यात पीएम किसान पेन्शन योजनेचे एकूण २ लाख ८ हजार लाभार्थी आहेत. योजनेचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर आयकर भरणा ...

पेन्शन परतीच्या नोटिशीला ८ हजार ३०९ शेतकऱ्यांचा ठेंगा!अडीच कोटी वसूल : ५ कोटी २७ लाखांची वसुली बाकी
धुळे जिल्ह्यात पीएम किसान पेन्शन योजनेचे एकूण २ लाख ८ हजार लाभार्थी आहेत. योजनेचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर आयकर भरणा आणि इतर कारणांमुळे १० हजार ९६६ शेतकरी पेन्शनसाठी अपात्र ठरले. या सर्वांना पेन्शनची रक्कम परत करण्याची नोटीस प्रशासनाने बजावली आहे. दरम्यान, आतापर्यंत २ हजार ६५७ शेतकऱ्यांनी पैसे परत केले आहेत तर ८ हजार ३०९ शेतकऱ्यांकडे अजूनही पैसे बाकी आहेत.
अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांवर वसुलीची सक्ती करणे योग्य होणार नाही तसेच महसूल विभाग कोरोनाच्या कामात व्यवस्त असल्याचे सांगण्यात आले.
आतापर्यंत २ कोटी ५२ लाख वसूल
आतापर्यंत २ हजार ६५७ शेतकऱ्यांनी पीएम किसान पेन्शनचे पैसे परत केले आहेत. त्यांच्याकडून २ कोटी ५२ लाख २ हजार रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
एकूण अपात्र लाभार्थी शेतकऱ्यांपैकी तब्बल ८ हजार ३०९ शेतकऱ्यांनी अजूनही पैसे परत केलेले नाहीत. त्यांच्याकडे ५ कोटी २७ लाख ६८ हजार रुपये इतकी रक्कम येणेबाकी आहे.
पैसे परत न करणारऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाच्या निर्देशाप्रमाणे पुढील उचित कार्यवाही केली जाणार आहे.
अनेक शेतकऱ्यांना अद्याप लाभ नाही
माझा मुलगा तलाठी, सर्कल, तहसीलदार यांना अनेकवेळा भेटला. कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु अद्याप लाभ मिळाला नाही. दोंडाईचा शिवारात शेती आहे. या शिवारातील सर्वच शेतकरी वंचित आहेत.
- सकवार खलाणे, मालपूर
शेतकरी पेन्शन योजनेचा एक रुपयाही मिळाला नाही. पाचवेळा आधारकार्ड अपडेट केले. मोबाईलवर मेसेज येतो. मात्र, खात्यात पैसे जमा होत नाहीत. तलाठी कार्यालयाच्या खेटा घालून हैराण झालो आहे.
- भीमसिंह राजपूत, मालपूर
कर भरणारे शेतकरी तसेच इतर कारणांमुळे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान पेन्शन योजनेचे पैसे वसुलीसाठी आधीच नोटिसा बजावल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी पैसे परत केले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांकडूनदेखील निरंतर वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या संसर्गात शेतकऱ्यांवर वसुलीसाठी सक्ती करणे योग्य होणार नाही शिवाय महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीदेखील कोविडच्या कामात व्यस्त आहेत. वसुली सुरुच राहणार आहे.
- मिलिंद कुलथे, तहसीलदार महसूल
पीएम किसान पेन्शन योजना आढावा
पीएम किसान पेन्शन योजनेचे लाभार्थी २०८०००
आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी २६५७
पैसे भरा म्हणून नोटीस दिलेले शेतकरी १०९६६
पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी ८३०९