मधमाश्यांच्या हल्ल्यात २ शिक्षकांसह ७० विद्यार्थी जखमी, कंटेनरचा धक्का लागल्याने उठले मोहळ
By अतुल जोशी | Updated: March 21, 2023 17:58 IST2023-03-21T17:54:52+5:302023-03-21T17:58:38+5:30
अधिक गंभीर असलेल्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मधमाश्यांच्या हल्ल्यात २ शिक्षकांसह ७० विद्यार्थी जखमी, कंटेनरचा धक्का लागल्याने उठले मोहळ
शिरपूर : तालुक्यातील विखरण येथे बस स्टॅण्डजवळील एका वडाच्या झाडावर असलेल्या गावठी मोहोळाला एका कंटेनरचा धक्का लागल्यामुळे मधमाश्या उडाल्या. त्यांनी हाकेच्या अंतरावरील शाळेवर हल्ला केला. यात दोन शिक्षकांसह ७० विद्यार्थ्यांना मधमाश्यांनी चावा घेतल्याची घटना मंगळवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडली. अधिक गंभीर असलेल्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहादाकडून शिरपूरकडे मोठा कंटेनर येत होता. त्यावेळी शिरपूर-शहादा मार्गावरील विखरण गावाच्या बसस्टॅण्डसमोरील एका वडाच्या झाडावर गावठी मोहोळ बसले आहे. कंटेनर मोठा असल्यामुळे त्याचा धक्का या मोहोळाला बसला. त्यामुळे मधमाश्या काही क्षणांतच उडून त्यांनी परिसरात अनेकांना सैरावैरा करून सोडले. तेथून हाकेच्या अंतरावर साने गुरुजी माध्यमिक विद्यालय असून, पाहता-पाहता तेथे वर्गात शिकत असलेल्या मुलांवरदेखील माश्यांनी हल्ला केला. मुलांना काही समजण्याआधीच शाळेतील बहुतांशी मुलांना माश्यांनी चावा घेतला. काही शिक्षकदेखील यात जखमी झाले. काहींनी वेळीच वर्ग बंद करून घेतल्यामुळे ते बचावले. बसस्टॅण्ड परिसरातील अनेक जण यात किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जण सैरावैरा पळत असल्यामुळे नेमके कारण समजू शकले नाही. थोड्या वेळानंतर मधमाश्या गायब झाल्या. त्यानंतर किरकोळ जखमींना घरी पाठविण्यात आले तर गंभीर जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले.
जखमींमध्ये शाळेतील शिक्षक संदीप सीताराम ढोळे, चंद्रकांत मुरलीधर शिरसाठ यांच्यासह विद्यार्थी स्नेहल सुदाम थोरात (१६), दिव्या माधवराव कोळी (१६), फैजल भय्या खाटीक (१२) आदींचा समावेश आहे.