५१ अंगणवाड्या होणार डिजीटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 12:37 IST2019-03-24T12:36:00+5:302019-03-24T12:37:07+5:30
धुळे जिल्हा : एका अंगणवाडीसाठी १ लाख ३३ हजार रूपये खर्च, आतापर्यंत दोन अंगणवाड्यांचे काम पूर्ण

dhule
धुळे : जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजीटल झालेल्या असून, आता जिल्ह्यातील अंगणवाड्यांची वाटचालही डिजीटलच्या दिशेने होऊ लागली आहे. २०१७-१८ या वर्षांतर्गत जिल्ह्यातील ५१ अंगणवाड्या डिजिटल होणार असून, यापैकी दोन अंगणवाड्यांचे डिजीटलायजेशन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील सूत्रांनी दिली आहे.
्रअंगणवाडीमध्ये महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, तसेच माता-बालक यांच्या आरोग्य, आहार व कुपोषण या अन्य बाबीकडे लक्ष पुरविणे अशा कार्याचा समावेश अंगणवाडीमध्ये होत असतो.
शिवाय पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील महिलांना आहार व आरोग्य याविषयी योग्य मार्गदर्शन करणे हे देखील अंगणवाडीचे मूलभूत कार्य आहे. ग्रामीण अथवा दुर्गम भागातील ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा अंगणवाडीतूनच होत असतो.
जिल्ह्यात २१०४ अंगणवाड्या
धुळे जिल्ह्यात २,१०४ अंगणवाड्या आहेत. त्यामार्फत ३ ते ६ वर्षे वयोगटातील ८७ हजार ९०१ बालके या ठिकाणी शिक्षण, आहार घेण्यासाठी येत असतात.
आता डिजीटलकडे वाटचाल
जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व ११०३ शाळा दोन वर्षांपूर्वीच डिजीटल झालेल्या आहेत. काही ठिकाणी डिजीटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. मात्र काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत केल्याने, डिजीटल शाळा नावालाच उरलेल्या आहेत.
दरम्यान आता जिल्हा परिषद शाळांपाठोपाठ अंगणवाड्यांचीही डिजीटलकडे वाटचाल सुरू आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षातील निधीतून ५१ अंगणवाड्यांना डिजीटलसाठी मंजुरी मिळालेली आहे.
अंगणवाडी डिजीटल करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीत एक टीव्हीसेट, टॉकिंग पेन, लॉजिक बोर्ड, सॉफ्टवेअर फॉर अंगणवाडी आदी साहित्य बसविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक अंगणवाडीत सोलर पावर पॅक बसविण्यात येणार आहे. एक अंगणवाडी डिजीटल करण्यासाठी १ लाख ३३ हजार १५० रूपये खर्च येणार आहे.
५१ अंगणवाड्यांमध्ये टीव्ही, टॉकिंग पेन, लॉजिक सॉफ्टबोर्ड, त्याचबरोबर सोलर पॉवर पॅक बसविण्यासाठी एकूण ६७ लाख ९० हजार ६५० रूपये खर्च मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्ह्यातील ६५ अंगणवाड्या डिजीटल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना डिजीटलद्वारे शिक्षण मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.