धुळ्यात ४० लाखांत व्यापाऱ्याची फसवणूक; बोजा असलेली मिळकत विकून दोघे फरार
By देवेंद्र पाठक | Updated: June 24, 2023 18:39 IST2023-06-24T18:37:15+5:302023-06-24T18:39:16+5:30
फरार झालेल्या दोनजणांविरोधात पश्चिम देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

धुळ्यात ४० लाखांत व्यापाऱ्याची फसवणूक; बोजा असलेली मिळकत विकून दोघे फरार
धुळे : देवपूर परिसरातील पौर्णिमा नगरात असलेल्या एका मिळकतीवर बोजा असताना ही मिळकत ४० लाखांना परस्पर विक्री करत व्यापाऱ्याची फसवणूक करण्यात आली. फरार झालेल्या दोनजणांविरोधात पश्चिम देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
मनोज गुलाबराव नाशिककर (रा. प्लॉट नंबर ६, नंदनवन बँक कॉलनी, देवपूर धुळे) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सन २०११ ते २०१८ या कालावधीत पौर्णिमा नगरातील एका मिळकतीवरील बाेजा असल्याची कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. तरीदेखील सौदापावती करून ही मिळकत विकण्यात आली. या मिळकतीच्या मोबदल्यात वेळोवेळी एकूण ४० लाख रुपये किमतीचे धनादेश देण्यात आले. मात्र, या मिळकतीवर फायनान्स कर्जाचा व जीएसटी विभागाचा बोजा असल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोन संशयिताचा शोध घेण्यात आला असता ते दोघेही फरार झाले आहेत. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात दोनजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहेत.