दरवर्षी साक्री शहराला पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणीटंचाई भासत असते. हा प्रश्न कायमचा निकाली निघावा म्हणून आमदार मंजुळा गावित, तसेच शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जोरदार पाठपुरावा केला होता. ही योजना मंजूर व्हावी म्हणून साक्री नगरपंचायतचे गटनेते ज्ञानेश्वर नागरे यांनीही पाठपुरावा सुरूच ठेवला होता. साक्री शहरासाठी पिण्याच्या पाण्याची योजना मालनगाव धरणातून घेण्यात येणार आहे. सुरुवातीला मालनगाव धरण परिसरातील शेतकऱ्यांनी या योजनेला तीव्र विरोध केला होता. अजूनही त्यांचा या योजनेसाठी विरोधच आहे; परंतु पिण्याच्या पाण्यात राजकारण करू नये किंवा आणू नये यासाठी आमदार मंजुळा गावित यांनी मंत्रालय स्तरावर जोरदार पाठपुरावा केल्याने ही योजना अखेर मंजूर करण्यात आली आहे. त्या मंजुरीचे पत्र मुंबई येथे आमदार मंजुळा गावित यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी सुपूर्द केले आहे. त्यामुळेही पाणीपुरवठा योजना आता आकारास येणार आहे. ही योजना १८ महिन्यांत पूर्ण करण्याची अट या मंजुरी पत्रात टाकण्यात आली आहे.
साक्री शहरासाठी ३७ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मंजुरी, आमदारांकडे पत्र केले सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST