२५ रस्त्यांसाठी १०२ कोटी १० लाख खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 22:26 IST2019-11-21T22:26:11+5:302019-11-21T22:26:28+5:30
सोशल मीडियावरील मेसेज : काम झाले का, तपासण्याचे आवाहन

२५ रस्त्यांसाठी १०२ कोटी १० लाख खर्च
धुळे : शहरातील वेगवेगळ्या २५ रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे १०२ कोटी १० लाख ९५ हजार ८७४ रुपयांचा निधी खर्च झाला आहे़ त्या रस्त्यांची कामे झाली का ते तपासा अशा आशयाचा मॅसेज गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होता़ परिणामी हा विषय चर्चेत राहिला़
या कामांमध्ये, वाखारकर नगर बोर्ड ते राजेंद्र सुरी नगर बोर्ड, वाडीभोकर रोड, साक्री रोड ते अमरधाम, ३० मीटर रस्ता समता नगर ते निसर्ग उपचार केंद्र, नकाणे रोड सावरकर पुतळा ते नकाणे गाव, चक्करबर्डी रोड ते सुरत बायपास रस्ता, सुरत बायपास ते गुरुद्वारा रस्ता, लेनिन चौक ते धान्य गोदाम पुढे बायपास महामार्ग, इंदिरा गार्डन गिता नगर ते वाडीभोकर रस्ता, श्रीराणा यांचे घर ते लिलाबाई चाळ चितोड नाका रस्ता, ८० फुटी रस्ता नटराज टॉकिज ते वाखारकर नगर, पेठ गल्ली नगरपट्टी ते जमनालाल बजाज रस्ता व गल्ली नंबर नंबर १ ते आग्रा रोड, सुदर्शन कॉलनी ते गणेश नगर, श्री स्वामी नारायण मंदिर ते भगतसिंग नगर ते बायपास महामार्ग, मोगलाई ते ड्रायव्हर सोसायटी ते कब्रस्तान रस्ता, अग्रवाल नगर ते मुंदडा यांचे घर ते जांभळे नर्सरी, वरखेडी रस्ता रामी प्लॉट ते मार्केट रस्ता, यलम्मा माता मंदिर ते नाला रस्ता, हीम हॉटेल ते वृंदावन कॉलनी रस्ता, प्रमोद नगर मधुरम मेडीकल ते अनमोल नगर बोर्ड व भाग्यश्री पिठाची गिरणी ते इंदिरा गार्डन रस्ता, जुने धुळे बर्फ कारखाना ते अॅक्सिडेशन पाँड, पटाणी पॅलेस ते ओमशांती सोसायटी आणि मोहाडी रेल्वे गेट ते म्हाडा वस्ती रस्ता अशा २५ रस्त्यांच्या कामांचा समावेश करण्यात आलेला आहे़
या विविध कामांसाठी कुठे १७ कोटी तर कुठे १५ कोटी, काही ठिकाणी ७ तर काही ठिकाणी ४ कोटी निधीचा समावेश आहे़ बहुसंख्य ठिकाणी १, २, ३ कोटींचा निधी खर्च केलेला आहे़ मोजक्याच रस्ता कामांसाठी लाखांचा निधी दर्शविण्यात आलेला आहे़ अशा २५ विविध रस्ते कामांसाठी तब्बल १०२ कोटी १० लाख ९५ हजार ८७४ रुपयांचा निधीचा समावेश आहे़
या सर्व रस्त्यांची कामे निधीनुसार झाली आहेत का? याची तपासणी धुळेकर नागरीकांनी करावी असे आवाहन देखील त्या मेसेजद्वारे केले जात असल्याचे समोर आले आहे़
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते ८० फुटी रस्ता (वगळला), स्वराज्य प्रतिष्ठान ते हजरत सायरा बानो हायस्कूल रस्ता (वगळला) या दोन रस्त्यांची कामे वगळण्यात आलेली आहेत़
शहरातील रस्तेसंदर्भात लागलीच माहिती देता येऊ शकणार नाही़ कोणते रस्ते झाले, कोणते बाकी आहेत, याची सविस्तर माहिती तपासल्यानंतरच सांगू शकेल, असे आयुक्त अजिज शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़