धुळे तालुक्यातील १२०० शेतकऱ्यांची होणार पीक प्रात्यक्षिकासाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST2021-06-02T04:27:12+5:302021-06-02T04:27:12+5:30
धुळे : कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत पीक प्रात्यक्षिकांसाठी धुळे तालुक्यातील १२०० शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ६ ...

धुळे तालुक्यातील १२०० शेतकऱ्यांची होणार पीक प्रात्यक्षिकासाठी निवड
धुळे : कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत पीक प्रात्यक्षिकांसाठी धुळे तालुक्यातील १२०० शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ६ जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जी. के. चौधरी यांनी केले आहे.
कृषी विभागाच्या माध्यमातून सन २०२१-२२ या वर्षासाठी पीक प्रात्यक्षिक राबविण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी २४ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. पीक प्रात्यक्षिकांसाठी समूह पद्धतीने अंमलबजावणी अपेक्षित असल्याने एका गावातून १० हेक्टर क्षेत्रासाठी प्रति प्रात्यक्षिक ०.४० हेक्टर क्षेत्राचे म्हणजेच २५ लाभार्थी प्रति समूह शेतकरी निवड करण्यात येईल.
या वर्षासाठी पीक प्रात्यक्षिक राबविण्याकरिता राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व गळीत धान्य अंतर्गत पीकनिहाय अर्ज अपेक्षित आहेत. योजनानिहाय पीक प्रात्यक्षिकाचे प्रकार असे (अनुक्रमे योजनेचे नाव, पीक प्रात्यक्षिक प्रकार, पिकाचे नाव, लक्ष्यांक (हेक्टरमध्ये), अपेक्षित शेतकरी संख्या) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य), अ- सलग गट प्रात्यक्षिके, तूर, १०, २५, मूग, ३० (हेक्टर), २५ (शेतकरी), उडीद, १० (हेक्टर), २५ (शेतकरी). ब- पीक पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिके, मूगनंतर गहू, १०, २५.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (पौष्टिक तृणधान्य), सलग गट प्रात्यक्षिके, खरीप ज्वारी, १०, २५, खरीप बाजरी, ३००, ७५०. राष्ट्रीय अन्नसुरक्षा (भरड धान्य), सलग पीक प्रात्यक्षिक, मका, १००, २५०. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत कापूस विकास कार्यक्रम, आद्य रेषीय प्रात्यक्षिके (कापूस पिकात आंतरपीक मूग, उडीद), कापूस-मूग-उडीद, १०, २५.
वरीलप्रमाणे ज्या गावांतून १० हेक्टर क्षेत्रासाठी अर्ज प्राप्त होतील, त्या गावांना प्राधान्य राहील. धुळे तालुक्यातील जे शेतकरी पीक प्रात्यक्षिकात भागात घेऊ इच्छितात त्यांनी तालुक्यातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे ६ जूनपर्यंत अर्ज सादर करावेत. त्यानंतर प्राप्त अर्जांमधून ७ जून रोजी लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना निविष्ठा वितरणाची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी चौधरी यांनी दिली.