धुळयात ‘ब्रेक द चेन’चे उल्लंघन करणाऱ्या १०१ दुकानांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST2021-05-21T04:38:14+5:302021-05-21T04:38:14+5:30
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूची साथ मोठ्या प्रमाणावर सुरु असल्यामुळे शासनाने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी ...

धुळयात ‘ब्रेक द चेन’चे उल्लंघन करणाऱ्या १०१ दुकानांना दंड
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूची साथ मोठ्या प्रमाणावर सुरु असल्यामुळे शासनाने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ निर्देश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी पोलिस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. धुळे शहरातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरु नये, मास्कचा नियमित वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांना कामकाजाची वेळ ठरवून दिली आहे. त्यानंतरही नागरिक विनामास्क आणि विनाकारण बाहेर फिरताना आढळून येत आहेत. याशिवाय काही आस्थापना, नागरिक शासनाच्या आदेशाचे पालन करीत नसल्याचे दिसून येत असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पिंगळे यांनी म्हटले आहे.
धुळे शहर उपविभागातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जीवनाश्यक आस्थापना वगळता इतर आस्थापना, हॉटेल यांचेवर कारवाई करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २१९ वाहन चालक यांच्यावर मोटार वाहन कायदा अन्वये केसेस करण्यात आल्या आहेत.