धुळे येथे कार, दोन पिस्तूल, काडतुसांसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 15:42 IST2019-06-05T15:42:07+5:302019-06-05T15:42:29+5:30
दरोड्याच्या प्रयत्नातील ७ जणांना अटक; बहुतांश डोंबिवलीचे रहिवासी; अनेक गंभीर गुन्हे दाखल

धुळे येथे कार, दोन पिस्तूल, काडतुसांसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकमत आॅनलाईन
धुळे : मध्यप्रदेश राज्यातून आलिशान कार व शस्त्रांसह दरोड्याच्या उद्देशाने जाणाऱ्या ७ जणांना येथील मोहाडी पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. त्यांच्याकडून कारसह दोन देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, तलवार, चाकू, सहा मोबाईल फोन, मिरची पूड व दोरी या एकूण १० लाख ९ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना माहिती मिळाली की, मध्यप्रदेश राज्यातून कार घेऊन निघालेल्या व्यक्ती महामार्गालगत टोल नाक्याच्या आसपास हॉटेलवर जेवणासाठी थांबणार आहेत. त्यानुसार पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनात लळींग टोलनाका परिसरात संशयित वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली.
संशयित कारचा पथकाकडून पाठलाग
पहाटे दीड वाजेच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक पायमोडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मराठे, ब्राम्हणे, पोलीस कॉन्स्टेबल ठोंबरे, जाधव, भामरे, वाघ, दाभाडे, महाले हे सर्व वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी महामार्गावर अवधान एमआयडीसी परिसरातील बालाजी प्लाय कंपनीजवळ गर्द काळा काचा असलेली एमएच ०३ एएम ८५६२ या क्रमांकाची कार झाडाच्या आडोशाला उभी असलेली दिसून आली. पोलिसांचे पथक या कारकडे जात असताना ही कार टोलनाक्याकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने कारचा पाठलाग करून टोलनाक्याजवळ थांबविली.
कारमध्ये मिळाली घातक शस्त्रे
तिची तपासणी केली. त्यात ९ लाख रुपयांची कार, ६० हजार रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल, २०० रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे, ५०० रुपये किमतीची तलवार, १०० रुपये किमतीचा चाकू, ४९ हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल फोन, मिरची पूड व दोरी असा एकूण १० लाख ९ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला. त्याबाबत कारमधील व्यक्तींना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची तसेच दिशाभूल करणारी माहिती दिली. त्यामुळे त्या सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून माहिती घेतली.
२० पेक्षा जास्त गंभीर व विविध स्वरुपाचे गुन्हे
कारमधील सातही जणांकडून माहिती घेतली असता त्यांच्यावर खंडणी, दरोड्यासह आर्म अॅक्टनुसार दाखल २० पेक्षा जास्त विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता ते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे आढळल्याने त्यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३९९, ४०२ सह भारतीय हत्यार कायदा ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या सातजणांना केली अटक
या कारवाईत अमित नामदेव पाटील (३३), रा.संगीता निवास, शिळफाटा रोड, काराई गाव, बोरीवली पूर्व, मुंबई, अभिषेक अरूण ढोबळे (२९), रा.नांदीवली गाव, डोंबिवली पूर्व, जि.ठाणे, पंकज सुरेश साळुंखे (२६) रा.दत्तकृपा, रूम नं.८, गणेश नगर, डोंबिवली पश्चिम, जि.ठाणे, जितेश पुकराज लालवाणी (३०), रा.टिळक नगर, तिसरा माळा, रूम नं.३०१, रा.डोंबिवली पूर्व, विकास कांतीलाल लोंढे (४२) रा.कुंभार कानपाडा, रागाई सावली, रूम नं. १०३, डोंबिवली पश्चिम, मंगेश कृष्णा भोईर (३९), रा.कृष्णा भोईर चाळ, रूम नं.१, गुप्ते रोड, जैन कॉलनी, डोंबिवली पश्चिम आणि रवींद्र सुरेश चव्हाण (४५) रा.चक्रधर कॉलनी, मोहाडी उपनगर, धुळे यांना अटक करण्यात आली.