सांस्कृतिक कार्यक्रमातील कलेक्टरांच्या नृत्याचा व्हिडीओ वायरल, टीकेची झोड; कलेक्टर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 19:58 IST2025-09-27T19:57:57+5:302025-09-27T19:58:54+5:30
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती किरण हे २४ सप्टेंबर रोजी संस्थानतर्फे आयोजित नवरात्र महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम स्थळी गेले होते.

सांस्कृतिक कार्यक्रमातील कलेक्टरांच्या नृत्याचा व्हिडीओ वायरल, टीकेची झोड; कलेक्टर म्हणाले...
धाराशिव : नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात एकीकडे पूरस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोक बाधित झाले आहेत. नुकसान प्रचंड झाले असताना जिल्हाधिकारी एका सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य करीत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ वायरल झाला असून, त्यावरून टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती किरण हे २४ सप्टेंबर रोजी संस्थानतर्फे आयोजित नवरात्र महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम स्थळी गेले होते. याठिकाणी कलावंत गायन सादर करीत असताना त्यांना मंचावर बोलावण्यात आले. सपत्निक मंचावर गेल्यानंतर कलावंतांनी आग्रह केला. त्यानुसार जिल्हाधिकारी टाळ्या वाजवत नृत्य करीत असल्याचे व्हिडीओतून दिसत आहे. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी लागलीच मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून निलंबनाची मागणी केली आहे. आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली नाही, तर २ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आत्मदहन करू, अशा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
महोत्सवच रद्द करा : खा. ओमराजे
पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी आत्महत्येच्या घटना जिल्ह्यात घडू लागल्या आहेत. घरांमध्ये पाणी शिरून अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांनी नृत्य करणे हे असंवेदनशीलतेचे लक्षण आहे. एकीकडे जगण्याची लढाई सुरू असताना महोत्सवाची गरजच काय, असा सवाल करीत महोत्सव रद्द करून तो निधी पूरग्रस्तांसाठी द्यावा, अशी मागणी खा. ओम राजेनिंबाळकर यांनी केली.
भावना दुखावल्यास दिलगीर : जिल्हाधिकारी
मंदिर संस्थानचा अध्यक्ष या नात्याने परंपरेनुसार देवीच्या धार्मिक व इतर उपक्रमात सहभागी व्हावे लागते. दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापनचा अध्यक्ष म्हणूनही दिवसरात्र मदतीच्या कामात आहे. काही क्षणासाठी महोत्सवात गेल्यानंतर लोक कलावंतांनी आग्रह केल्याने मंचावर गेलो. देवीचे स्तवन सुरू होते. देवीचा एक भाविक म्हणून त्यात सहभागी झालो, तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.