भूममध्ये ४ तासांत दोन ट्रॅक्टर उलटून धाराशिव रोडवर उसाचा खच साचला; वाहतुकीस फटका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 18:15 IST2025-12-20T18:12:29+5:302025-12-20T18:15:29+5:30
सुदैवाने जीवितहानी टळली, रस्त्यावर सांडलेला ऊस बनला जनावरांचा चारा; अपघाताच्या ठिकाणी पशुपालकांची गर्दी.

भूममध्ये ४ तासांत दोन ट्रॅक्टर उलटून धाराशिव रोडवर उसाचा खच साचला; वाहतुकीस फटका!
भूम (धाराशिव): भूम शहरातील धाराशिव रस्त्यावरील शंकरराव पाटील महाविद्यालयाजवळ आज अपघातांची एक थरारक मालिका पाहायला मिळाली. अवघ्या चार तासांच्या अंतरात उसाने भरलेल्या दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या उलटल्या. सुदैवाने, या दोन्ही मोठ्या अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यावर उसाचा खच साचल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
पहिला अपघात दुचाकीस्वारांना वाचवताना
पहिली घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथून ऊस भरून निघालेला ट्रॅक्टर (MH 13 BR 316) बानगंगा साखर कारखान्याकडे जात होता. यावेळी समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वार युवकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टरची ट्रॉली रस्त्यावर पलटी झाली.
दुसऱ्या ट्रॅक्टरचा उसानेच घात केला
पहिल्या अपघातामुळे रस्त्यावर उसाचा खच पडला होता. थोड्याच वेळात तांदुळवाडीहूनच दुसरा ट्रॅक्टर तिथे आला. समोर अपघात पाहून चालकाने ब्रेक दाबला, पण रस्त्यावर सांडलेल्या उसाच्या कांड्यांवरून चाक घसरल्याने हा ट्रॅक्टरही दोन ट्रॉल्यांसह पलटी झाला. या दुसऱ्या अपघातात एका दुचाकीचे आणि एका चारचाकीचे मोठे नुकसान झाले.
पशू पालकांनी चाऱ्यासाठी नेला ऊस
या अपघातात ऊस रस्त्यावर सांडल्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, तिथेच एक अनोखं चित्र पाहायला मिळालं. अपघातात सांडलेला हा ऊस खराब होण्याऐवजी काही पशुपालकांनी आपले पशू तिथेच ऊस खाण्यासाठी सोडले, तर काही शेतकऱ्यांनी हा ऊस पोत्यात भरून आपल्या जनावरांसाठी चारा म्हणून घरी नेला. अपघाताच्या भीषणतेत जनावरांना मात्र एका दिवसाचा चारा विनामूल्य मिळाला. स्थानिकांनी तातडीने मदतकार्य केल्याने रस्ता एक तासांत मोकळा करण्यात आला असून, उसाच्या अवजड वाहतुकीमुळे होणाऱ्या धोक्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.