दहावी परीक्षेत जिल्ह्यातील सव्वाबारा हजार विद्यार्थ्यांना ‘डिस्टिंक्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST2021-07-17T04:25:54+5:302021-07-17T04:25:54+5:30
उस्मानाबाद - काेराेनामुळे यंदा परीक्षा झाल्या नाहीत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आलेल्या अंतर्गत मूल्यमापनाच्या ...

दहावी परीक्षेत जिल्ह्यातील सव्वाबारा हजार विद्यार्थ्यांना ‘डिस्टिंक्शन’
उस्मानाबाद - काेराेनामुळे यंदा परीक्षा झाल्या नाहीत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आलेल्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल तयार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेला हा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील २२ हजार ७३२ पैेकी तब्बल २२ हजार ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, यापैकी थाेडेथाेडके नव्हे तर १२ हजार ४४० परीक्षार्थींना डिस्टिंक्शन मिळाले आहे. शाळांनी केलेल्या अंतर्गत मूल्यमापनातही सावित्रीच्या लेकीच अव्वल ठरल्या आहेत. जिल्ह्याचा एकूण निकाल ९९.४२ टक्के लागला आहे.
काेराेनाची पहिली लाट ओसरल्यानंतर परीक्षा मंडळाकडून दहावी, बारावी परीक्षेची तयारी करण्यात आली हाेती. त्यानुसार जिल्हा पातळीवर नियाेजनही पूर्ण झाले हाेते. असे असतानाच काेराेनाची दुसरी लाट धडकली. ही लाट तीव्र स्वरूपाची हाेती. त्यामुळे शासनाने दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला हाेता. निकाल तयार करण्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचा आधार घेण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातील २२ हजार ७३३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली. प्रत्यक्षात २२ हजार ७३२ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामुळे निकाल कधी जाहीर हाेणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले हाेते. अखेर शुक्रवारी दुपारी परीक्षा मंडळाने ऑनलाईन निकाल जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्याचा निकाल ९९.४२ टक्के लागला आहे. म्हणजेच २२ हजार ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी १२ हजार ४४० विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आले आहेत. ८ हजार ७५ विद्यार्थी असे आहेत, त्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. १ हजार ३२४ विद्यार्थी द्वितीय तर ७८० जण निव्वळ उत्तीर्ण झाले आहेत. ओव्हरवाॅल निकालात अवघे १०३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
चाैकट...
मुलीच ठरल्या सरस...
निकाल दहावीचा असाे की बारावीचा. प्रत्येक वर्षी मुलीच अव्वल ठरतात. काेराेनाच्या संकटामुळे यंदा शाळांनी केलेल्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. याहीवेळी मुलींनीच बाजी मारली आहे. १२ हजार ६५० मुलांचे मूल्यमापन करण्यात आले. यापैकी १२ हजार ५७५ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९९.४० टक्के एवढे आहे तर दुसरीकडे १० हजार ८२ मुलींचे मूल्यमापन करण्यात आले. यापैकी १० हजार २६ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.४४ टक्के एवढे आहे म्हणजेच, ०.४ टक्क्यांनी अधिक आहे, हे विशेष.
परंडा तालुका ठरला अव्वल
दहावीच्या निकालामध्ये यंदा परंडा तालुका अव्वल ठरला आहे. ९९.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर उस्मानाबाद ९९.३६, भूम ९९.७७, कळंब ९९.४०, लाेहारा ९९.६०, उमरगा ९९.२५, तुळजापूर ९९.१५ आणि वाशी तालुक्याचा निकाल ९९.८० टक्के लागला आहे.
रिपीटरचा ८६.९१ टक्के निकाल...
जिल्ह्यातील ९५५ रिपीटर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. शुक्रवारी निकाल जाहीर झाला असता, ८३० जण उत्तीर्ण झाले आहेत. यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.९१ टक्के एवढे आहे. त्यामध्ये मुलांची संख्या ६४२ तर मुलींची संख्या १८० एवढी आहे.
संकेतस्थळ ठप्प...
परीक्षा मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर केला. परंतु, ज्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आला हाेता, ते संकेतस्थळ दिवसभर ठप्प झाले हाेते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता आला नाही.