निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप : दहावी-अकरावी गुणांनी वाढविली चिंता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:50+5:302021-07-18T04:23:50+5:30
उमरगा : बारावीच्या निकालात ३०:३०:४० टक्के म्हणजे दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के आणि बारावी ४० टक्के असे गुण ...

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप : दहावी-अकरावी गुणांनी वाढविली चिंता!
उमरगा : बारावीच्या निकालात ३०:३०:४० टक्के म्हणजे दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के आणि बारावी ४० टक्के असे गुण घेण्याचे ठरले आहे. तिन्हीचे मिळून विद्यार्थ्यांना ॲव्हरेज गुण मिळणार आहेत. याचाच फटका बसण्याची चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन निकषांची शिफारस करण्यासाठी ३०:३०:४० फॉर्म्युला ठरला आहे. म्हणजेच दहावी आणि अकरावीच्या अंतिम निकालास ३० टक्के वेटेज दिले जाईल. इयत्ता बारावीच्या पूर्व बोर्ड परीक्षेला ४० वेटेज दिले जाईल, हे सूत्र निकालाचे असणार आहे. बारावीचा अंतिम निकाल दहावी, अकरावी आणि बारावीच्या पूर्व बोर्डच्या निकालाच्या आधारावर तयार केला जाईल. तसेच ज्या मुलांना परीक्षा द्यावयाची आहे त्यांच्यासाठी नंतर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल.
३१ जुलैला निकाल जाहीर होणार आहे. यात दहावीच्या पाच विषयांपैकी तीन विषयांचे सर्वोत्कृष्ट गुण, अकरावीच्या पाच विषयांचे सरासरी गुण आणि बारावी पूर्व बोर्ड परीक्षा आणि प्रॅक्टिकलचे गुण घेतले जाणार आहेत. दहावीचे ३० टक्के गुण, अकरावीच्या गुणातील ३० टक्के आणि १२ वी च्या ४० गुणांवर आधारित निकाल लावण्यात येतील. या मूल्यांकन निकषांमुळे अकरावी रेस्ट इअर समजून बारावीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलेल्या मुलांना फटका बसणार आहे. अकरावीचे गुण ३० टक्के धरण्यात येणार असल्याने ३० टक्के सूत्र गणित बिघडविणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी बारावीच्या गुणांची चिंता न करता पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा, असे शिक्षण तज्ज्ञ सांगत आहेत.
उमरगा तालुका बारावी स्टेट बोर्ड विद्यार्थी
मुले-१६१२
मुली-१५९१
३० टक्के सूत्र गणित बिघडविणार !
अनेक विद्यार्थी अकरावीला नियमित कॉलेज करीत नाहीत. दहावीला अभ्यास करून बोर्ड परीक्षा दिल्याने अनेक विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर समजतात. अकरावीच्या ३० टक्क्यांमुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी होईल. त्यापेक्षा ३०:२०:५० हा फॉर्म्युला असायला हवा होता.
- राणा पवार, विद्यार्थी, उमरगा
अकरावीमध्ये प्रवेश केल्यानंतर अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी बराच वेळ जातो. तसेच ११ वी वर्गाकडे ‘रेस्ट इअर’ म्हणून पाहिले जाते. त्यामुळे अकरावीत अपेक्षेप्रमाणे गुण मिळत नाहीत. बारावीलासुद्धा त्याआधारे गुण दिले गेले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल.
- प्रीती प्रदीप मोरे, विद्यार्थिनी
विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षेवर फोकस ठेवावा
सध्या बारावीचा निकाल तयार करणे चालू आहे. निकाल तयार करण्यासाठी ३०-३०-४० हा फॉर्म्युला वापरला जातो आहे. यामुळे ज्यांनी वर्षभर काहीच अभ्यास केला नाही व ज्यांनी खूप अभ्यास केला ते सर्व जवळपास थोड्या मार्काच्या फरकाने पास होत आहेत. त्यामुळे पुढील सर्व अभ्यासक्रमांसाठी सीईटीचे मार्क गृहीत धरावे.
- प्रा. डी. टी. पाटील, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा
बारावीच्या निकालासाठी शासनाने सांगितलेल्या मूल्यांकनाच्या ३०:३०:४० या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. गुण कमी होण्याची भीती त्यांच्या मनात आहे. परंतु विद्यार्थ्यांनी या निकालाचा विचार न करता उच्च शिक्षणासाठी असलेल्या प्रवेश परीक्षाच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे.
- प्रा. प्रशांत साळुंके, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा.