तुळजाभवानीचा ‘भारतमाता’ उल्लेख; मंदिर संस्थानच्या पत्रावरून गदारोळ, पुजारी मंडळ आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 19:17 IST2025-06-16T19:06:57+5:302025-06-16T19:17:14+5:30
तुळजाभवानीचा ‘भारतमाता’ म्हणून उल्लेखावर तिन्ही मंडळांनी घेतला आक्षेप

तुळजाभवानीचा ‘भारतमाता’ उल्लेख; मंदिर संस्थानच्या पत्रावरून गदारोळ, पुजारी मंडळ आक्रमक
तुळजापूर (जि. धाराशिव) : शहर व मंदिर विकास अंतर्गत शहरातील रामदारा तलाव परिसरात श्री तुळजाभवानी देवीचे १०८ फुटी भवानी तलवार शिल्प कलारूपी पुतळा उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात भोपे पुजारी, पाळीकर पुजारी व उपाध्ये पुजारी या मंडळांना पत्र पाठवून सूचना, मते मागविली हाेती. या पत्रामध्ये श्री तुळजाभवानी भारताची भारतमाता झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या शब्दावर आता तिन्ही पुजारी मंडळांनी आक्षेप घेत विराेध केला आहे.
श्री तुळजाभवानी देवीच्या १०८ फुटी भवानी तलवार शिल्पाबाबत विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बैठक घेऊन सविस्तर माहिती दिली हाेती. यानंतर मंदिर संस्थानने पुजाऱ्यांच्या तिन्ही मंडळांना पत्र पाठवून सूचना मागविल्या हाेत्या. याच पत्रामध्ये श्री तुळजाभवानी देवी भारताची भारतमाता झाली आहे, असा उल्लेख हाेता. ही बाब समाेर आल्यानंतर तिन्ही मंडळांनी तीव्र शब्दात आक्षेप नाेंदविला. वास्तविक पाहता देवतांची इतर कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. श्री तुळजाभवानी ही देवता तर जगत जननी म्हणून ओळखली जाते. असे असताना मंदिर प्रशासनाने भारतमाता असा उल्लेख का केला? असा प्रश्न पुजारी मंडळांनी केला आहे. मंदिर प्रशासन कोणताही धार्मिक निर्णय घेताना पुजारी व सर्व महंतांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत आहे. त्यामुळे अनेक निर्णय वादग्रस्त ठरताहेत. याबाबतीत वेळीच सुधारणा व्हायला, हवी असेही पुजाऱ्यांचे म्हणणे आहे.
कडाडून विराेध केला जाईल
भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला मंदिर संस्थानने पत्र दिले आहे. परंतु, या पत्रात तुळजाभवानी माता ही आता भारतमाता आहे, असा उल्लेख केलाय. याला विराेध आहे. भवानी तलवार हे शिल्प अष्टभुजा स्वरूपात न राहता सद्य:स्थितीत ज्या पद्धतीत मंदिरात पूजा मांडली जाते त्याच स्थितीत असावे. इतर कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यास कडाडून विराेध केला जाईल.
-अमरराजे परमेश्वर, अध्यक्ष, भाेपे पुजारी मंडळ.
जागा अतिशय चुकीची
पुजाऱ्यांनी पत्रावर आक्षेप घेतल्यानंतर भवानीमाता हा शब्द वगळून नवीन शुद्धिपत्रक काढले आहे. परंतु, मुळातच ज्या ठिकाणी हे शिल्प उभारले जाणार आहे, त्या ठिकाणाला आमचा विराेध आहे. कारण ती जागा अतिशय चुकीची व गावच्या एका कोपऱ्यात आहे. याबाबतीतही विचार व्हायला हवा.
-बिपीन शिंदे, अध्यक्ष, पाळीकर पुजारी मंडळ.