धाराशिव जिल्हा परिषदेत बदल्यांचा हंगाम; पाच प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 11:37 IST2025-07-16T11:36:58+5:302025-07-16T11:37:44+5:30
अनेक महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकारी रुजू होणार असल्याने कामकाजाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

धाराशिव जिल्हा परिषदेत बदल्यांचा हंगाम; पाच प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आले
धाराशिव: धाराशिवजिल्हा परिषदेतील कार्यकाळ पूर्ण झालेल्या पाच प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी उशिरा जारी करण्यात आले. या बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. अनेक महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकारी रुजू होणार असल्याने कामकाजाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांची बीड येथे याच पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी आता नवीन अधिकारी येणार आहेत. तसेच, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले यांची लातूर पंचायत समिती गट विकास अधिकारी पदावर बदली झाली आहे. सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांना सोलापूर येथे ग्रामपंचायत विभागात नवीन जबाबदारी मिळाली आहे.
रोजगार हमी योजना कक्षाचे मिरगणे यांची औसा पंचायत समिती गटविकास अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे, तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता केत यांना धाराशिव येथेच सार्वजनिक बांधकाम विभागात काम करण्याची संधी देण्यात आली आहे, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे.
या बदल्यांमुळे रिक्त झालेल्या जागांवर नवीन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामविकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकपदी अनुप शेंगुलवार यांची नियुक्ती झाली आहे. श्याम गोडभरले यांच्या जागी हिंगोली येथून ए. आर. कुंभार धाराशिवला येत आहेत, तर भुजबळ यांच्या ठिकाणी लातूर पंचायत समितीचे बीडीओ टी. के. भालके यांना संधी मिळाली आहे. या नवीन नियुक्त्यांमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.