सावकारांकडून व्यापाऱ्यांनी घेतले १३५ कोटींचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:26 IST2021-01-14T04:26:58+5:302021-01-14T04:26:58+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील सहकार विभागाकडे जिल्ह्यात १६५ अधिकृत सावकार असल्याची नोंद आहे. या सावकरांकडून मागील वर्षभरात १ हजार १८३ ...

सावकारांकडून व्यापाऱ्यांनी घेतले १३५ कोटींचे कर्ज
उस्मानाबाद : जिल्ह्यातील सहकार विभागाकडे जिल्ह्यात १६५ अधिकृत सावकार असल्याची नोंद आहे. या सावकरांकडून मागील वर्षभरात १ हजार १८३ व्यापाऱ्यांनी १३५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था उस्मानाबाद या कार्यालयाकडे आठ तालुक्यातील १६५ परवानाप्राप्त सावकारांची नोंद आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात ४१, परंडा १९, भूम २७, कळंब १७ तालुक्यात १७, तुळजापूर तालुक्यात २८, उमरगा १९, वाशी १०, लोहारा तालुक्यात ४ सावकारांचा समावेश आहे. जिल्ह्यात या सावकारांकडून १३५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील सावकारांकडून ३९० कर्जदारांना ५ लाख ९५ हजार, परंडा तालुक्यात १९८ जणांना ५२ लाख ४२ हजार, भूम तालुक्यात ११५ कर्जदारांना १० लाख ४१ हजार, कळंब तालुक्यात २१५ कर्जदारांना ३६ लाख, तुळजापूर तालुक्यात १०७ व्यक्तींना ९ लाख ७३ हजार, वाशी तालुक्यातील ५५ जणांना ९ लाख २ हजार, लोहारा तालुक्यात ३० कर्जदारांना १ लाख ५ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहेत.
चौकट...
अनधिकृत सावकारी
जिल्ह्यात अनधिकृत सावकारी मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. २०१४ वर्षापासून ६० अनधिकृत सावकारांविरुध्द गुन्हे दाखल झालेले आहेत. अनेकजण भितीपोटी तक्रार दाखल करीत नाहीत. शहरासह ग्रामीण भागात अवाढव्य वाज आकारत आहेत. मात्र प्रशासनाकडे त्यापैकी कुणाबदलही अधिकृत तक्रार नाही.
वर्षात १२७ आत्महत्या
जिल्ह्यात वर्षादोन वर्षाआड दुष्काळ, नापीकी, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक जाते. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होतात. कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने गळफास लावून, विष प्राषण करुन अनेक जण आपली जिवनयात्रा संपवित असतात. २०२० वर्षात सुमारे १२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
अधिकृत सावकारांची व्याजदर आकारणी
अधिकृत सावकारांकडून तारण कृषी कर्ज घेतल्यास वर्षाला नऊ टक्के, बिगरतारणसाठी १२ टक्के, बिगर कृषी तारण कर्जासाठी १५ टक्के आणि बिगर कृषी बिगर तारणसाठी १८ टक्के व्याजदर आकारला जातो.