आज तुळजाभवानीची 'रथ अलंकार महापूजा'; सूर्य नारायणाचा रथ घेऊन देवी पाहते भक्तांच्या व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:54 IST2025-09-26T13:53:26+5:302025-09-26T13:54:39+5:30
ललिता पंचमीच्या निमित्ताने रथ अलंकार महापूजेला आहे विशेष महत्व; भर पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती

आज तुळजाभवानीची 'रथ अलंकार महापूजा'; सूर्य नारायणाचा रथ घेऊन देवी पाहते भक्तांच्या व्यथा
- गोविंद खुरूद
तुळजापूर (धाराशिव): शारदीय नवरात्र उत्सवातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ललिता पंचमीच्या (पाचव्या माळेच्या) निमित्ताने आज तुळजाभवानी मातेची विशेष 'रथ अलंकार महापूजा' मांडण्यात आली. भर पावसातही तुळजापुरात हजारो भाविकांनी हजेरी लावून देवीच्या या विहंगम रूपाचे दर्शन घेतले.
शुक्रवारी पहाटे ६ वाजता अभिषेक घाट आणि पंचामृत अभिषेकास प्रारंभ झाला. दैनंदिन विधी पार पडल्यानंतर भोपे पुजारी बांधवांनी ललिता पंचमीनिमित्त देवीची विशेष रथ अलंकार महापूजा मांडली. या पूजेत सिंहासनाला चांदीचा रथ बनवण्यात आला होता. या रथासमोर सात अश्व (घोडे) बांधलेले असून, आई तुळजाभवानी हातात चाबुक घेऊन या रथात आरूढ झालेली दिसत होती. तुळजाभवानी या रथात बसून पृथ्वी भ्रमणाला निघाली आहे, अशा पद्धतीने ही आकर्षक पूजा साकारण्यात आली होती.
रथ अलंकार महापूजेचे खास महत्त्व
धार्मिक आख्यायिकेनुसार, भगवान सूर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ तुळजाभवानी मातेस दिला होता. याच रथात बसून माता तुळजाभवानी पृथ्वीवरच्या आपल्या भक्तांच्या सुख-दुःखांच्या व्यथा जाणून घेते, अशी श्रद्धा आहे. याच परंपरेतून या रथ अलंकार अवतार पूजेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भर पावसातही आई तुळजाभवानीचे हे अद्भुत रूप पाहण्यासाठी हजारो भाविकांनी तुळजापुरात गर्दी केली होती.
देवी निघाली पृथ्वी भ्रमणाला! तुळजाभवानी मंदिरात मांडण्यात आली रथ अलंकार महापूजा, हजारो भाविकांनी घेतले दर्शन. सूर्य नारायणांनी दिलेला रथ घेऊन तुळजाभवानी पाहते भक्तांच्या व्यथा. #dharashiv#tulajabhavani#marathwadapic.twitter.com/OZaHvZwchX
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 26, 2025
विशेष छबीना मोर दर्शनास गर्दी
दरम्यान,गुरुवारी सायंकाळची अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रातील विशेष छबीना मोर या वाहनावर काढण्यात आला होता. हा छबीना पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. यावेळी मंदिर अधिकारी, पुजारी, गोंधळी, आराधी सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संपूर्ण मंदिर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन गेले होते.