तीर्थ पचेना, रोचकरींची याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:36 IST2021-08-24T04:36:54+5:302021-08-24T04:36:54+5:30
उस्मानाबाद : बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राचीन तीर्थकुंड हडप केल्याचा आरोप असलेल्या तुळजापुरातील देवानंद रोचकरी यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला कारवाईचा आदेश ...

तीर्थ पचेना, रोचकरींची याचिका फेटाळली
उस्मानाबाद : बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राचीन तीर्थकुंड हडप केल्याचा आरोप असलेल्या तुळजापुरातील देवानंद रोचकरी यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला कारवाईचा आदेश स्थगित करावा, अशी मागणी असलेली याचिका रोचकरी औरंगाबादच्या खंडपीठात दाखल केली होती. यावर झालेल्या सुनावणीनंतर खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
तुळजापुरातील प्राचीन मंकावती तीर्थकुंड बनावट कागदपत्रे बनवून हडप केल्याचा आरोप देवानंद रोचकरी व बाळासाहेब रोचकरी यांच्यावर आहे. याप्रकरणात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कठोर पावले उचलत फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. तसेच तीर्थकुंड पुन्हा शासन खाती जमा करून घ्यावा, तीर्थकुंडाचे काही नुकसान केले असल्याने याअनुषंगानेही कारवाई करण्याचे आदेश दिवेगावकर यांनी दिले होते. या आदेशानंतर रोचकरी यांच्यावर बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या ते पोलीस कोठडीची हवा खात आहेत. याचदरम्यान, रोचकरी खंडपीठात आपणास म्हणणे मांडण्याची संधीच दिली नसल्याचा दावा करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली होती. यावर झालेल्या सुनावणीत सरकार पक्षाच्या वतीने रोचकरी यांनी याचिकेत दिलेले सर्वच मुद्दे खोडून काढले. चौकशी समितीने तीर्थकुंड हा शासनाच्या मालकीचा असल्याचा अहवाल पुराव्यानिशी दिल्याने कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्यांचे म्हणणे समजून घेण्यासाठी भूमी अभिलेखकडून सुनावणी घेण्यात येत आहे. ती सध्या सुरूच आहे. नगरविकास खात्यानेही रोचकरी यांचे अपील फेटाळून लावत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कायम ठेवले आहेत. तसेच याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन आदेशाची अंशत: अंमलबजावणी झालेली असल्याने त्यास स्थगिती मिळू नये, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने रोचकरींची याचिका फेटाळून लावली आहे.
रोचकरींचा कोठडीतील मुक्काम वाढला...
याप्रकरणात गुन्हा दाखल असलेले देवानंद रोचकरी व बाळासाहेब रोचकरी दोघेही पोलीस कोठडीत आहेत. सोमवारी त्यांची कोठडी संपुष्टात आल्यानंतर पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले होते. तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याची गरज असल्याचे न्यायालयासमोर पोलिसांनी सांगितले. त्यामुळे एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली. दरम्यान, मंगळवारी आरोपींना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.