हजारो विद्यार्थी ४५ दिवसांच्या ‘सेतू’ बंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:23+5:302021-07-04T04:22:23+5:30

मागील वर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित ४५ दिवसांचा उपक्रम कळंब : कोविडमुळे मागच्या वर्षभरात ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ अशीच काहीशी स्थिती ...

Thousands of students in 45 days of 'Setu' bond | हजारो विद्यार्थी ४५ दिवसांच्या ‘सेतू’ बंधनात

हजारो विद्यार्थी ४५ दिवसांच्या ‘सेतू’ बंधनात

मागील वर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित ४५ दिवसांचा उपक्रम

कळंब : कोविडमुळे मागच्या वर्षभरात ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ अशीच काहीशी स्थिती आहे. यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी आले तसे पुढे ‘प्रवेशित’ झाले. असे असले तरी त्या विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती मात्र शंका वाढविणारीच. यामुळेच शिक्षण विभागाने सध्या मागच्या वर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित ४५ दिवसांचा ‘सेतू’ हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून, याद्वारे हजारो विद्यार्थ्यावर ‘फोकस’ करण्यात आले आहे.

गतवर्षी जूनमध्ये नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी लॉकडाऊनमुळे शाळा कुलूपबंदच होत्या. या स्थितीत नियमित शालेय कामकाज होऊ न शकल्याने शैक्षणिक वर्षाची स्थिती जवळपास ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ अशीच होती. याच अनुषंगाने शिक्षण विभागाने विद्यार्थी, पालकांशी विविध माध्यमांतून ‘कनेक्ट’ होत अभ्यासक्रमीय घटकांची क्षमता संपादन होईल याकडे लक्ष दिले होते. त्यानुसार गतवर्षभर ‘डिस्टन्स एज्युके‌शन’चा अवलंब करीत शिक्षण देण्या अन् घेण्यावर भर देण्यात आला होता. असे असतानाच पटसंख्येवरील सर्वच विद्यार्थ्यांच्या घरात ऑनलाईन शिक्षणाचे पाऊल पडले का? त्यातून अभ्यासक्रमीय घटकांची अध्ययन निष्पत्ती झाली का? हा विषय तसा संशोधनाचा होता. यामुळेच शालेय शिक्षण विभागानेही त्यास गांभीर्याने घेतले होते. यातच यंदाचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर मागच्या वर्षातील अभ्यासक्रमीय घटकांच्या संपादनाचा विषय अजेंड्यावर आल्याने शिक्षण विभागाने इयत्ता व विषयनिहाय क्षमता संपादनाचा ‘फॅक्ट चेक’ करीत पडताळणी, उजळणी करण्यासाठी ‘सेतू अभ्यासक्रम’ हा उपक्रम हाती घेतला. सध्या तालुक्यातील सर्व खासगी, जि. प., अनुदानित, विनाअनुदानित शाळांत हा उपक्रम राबविला जात आहे. यासाठी इयत्ता दुसरी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ‘सेतू’ च्या माध्यमातून जोडण्यात आले आहे. यात गणित, इंग्रजी, मराठी, हिंदी, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयांतील मागच्या शैक्षणिक वर्षातला इयत्तानिहाय अभ्यासक्रम घेतला जात आहे. यातून महत्त्वाच्या क्षमता प्राप्त झाल्या आहेत का? यावर भर दिला जात आहे. १ जुलै ते १४ ऑगस्ट असा ४५ दिवस हा ‘सेतू अभ्यासक्रम’ राबविला जाणार असून, यात तालुक्यातील जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांवर ‘फोकस’ करण्यात आले आहे.

दरदिवशी नवं ‘वर्क शीट’

यावर्षी विद्यार्थी नव्या वर्गात गेला असला तरी आगामी १४ ऑगस्टपर्यंत त्याच्या जुन्या अभ्यासक्रमाची संपादन क्षमता पडताळून पाहण्याचे काम ‘सेतू’च्या माध्यमातून केले जात आहे. यासाठी वर्गशिक्षक सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी, पालकांशी जोडले गेले आहेत. यात विद्यार्थी व कृती केंद्रित, अध्ययन निष्पत्ती आधारित, स्वयंअध्ययनावर भर देणारी, इयत्तानिहाय असलेली ‘कृतिपत्रिका’ दरदिवशी देऊन त्या विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या जात आहेत. याशिवाय संबोध क्षमता अधिक स्पष्ट व्हाव्यात यासाठी ‘ई साहित्य’चा वापर केला जात आहे.

गुरुजींची भूमिका महत्त्वाची

विद्यार्थ्याचे गत शैक्षणिक वर्ष ‘शाळा बंद, शिक्षण चालू’ असे पार पडले. यात नव्या वर्षात सर्वांना पुढच्या वर्गात ‘प्रविष्ट’ केल्याने विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवास ‘आला तसा, पुढं गेला’ असा होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘सेतू’ उपक्रम हाती घेतला आहे. यात तीन चाचण्या होणार असून, त्या विद्यार्थ्यांकडून सोडवून घेणे, त्याची तपासणी करणे, त्याच्या गुणांची नोंद ठेवणे हे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. याशिवाय ज्या मुलांच्या घरी ‘स्मार्ट’ फोन नाही, त्यांच्याकडे स्वतः ‘अप्रोच’ होणे अपेक्षित आहे. एकूणच या उपक्रमात काही शाळा, काही शिक्षक उत्तम कार्य करीत असले तरी काही शिक्षक ‘आला तसा, दिवस गेला’ असेच वागत असल्याने अध्ययनासमवेतच उपक्रमाच्या निष्पत्तीची कसोटी लागणार आहे.

Web Title: Thousands of students in 45 days of 'Setu' bond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.