धाराशिवमधील महिलेच्या हत्येतील मुख्य आरोपीला अटक; संतोष देशमुख खुनाचेही धागेदोरे हाती लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:22 IST2025-04-01T12:19:36+5:302025-04-01T12:22:06+5:30
या महिलेचा मृतदेह तिच्या घरात सडलेल्या अवस्थेत शनिवारी पोलिसांना आढळून आला होता.

धाराशिवमधील महिलेच्या हत्येतील मुख्य आरोपीला अटक; संतोष देशमुख खुनाचेही धागेदोरे हाती लागणार?
Dharashiv Murder Crime : धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात वास्तव्यास असलेल्या बीड जिल्ह्यातील आडसच्या मनीषा बिडवे या महिलेच्या खून प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सदर महिलेच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले या मुख्य आरोपीसह उस्मान गुलाब सय्यद याला अटक केली आहे. या खून प्रकरणाचा केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशीही संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने आरोपींच्या अटकेने नवी माहिती उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मनीषा बिडवे या महिलेचा मृतदेह तिच्या घरात सडलेल्या अवस्थेत शनिवारी पोलिसांना आढळून आला होता. या महिलेचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कनेक्शन असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अंजली दमानिया यांनी सोमवारी केला. मात्र, स्थानिक कळंब पोलिसांनी, अशी काही माहिती नसल्याचं काल स्पष्ट केलं आहे.
बीड जिल्ह्यातील आडस येथील मनीषा बिडवे ही महिला काही महिन्यांपासून कळंब शहरात एकटीच वास्तव्यास होती. मागच्या आठवडाभरात या घरातून कोणतीही हालचाल न दिसल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.पोलिसांनी दार उघडून पाहिले असता मनीषा बिडवे यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. महिलेच्या डोक्याला जखमा होत्या व जवळच हातोडा पडलेलाही दिसून आला. यावरून खुनाची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू होता. अखेर सोमवारी रात्री या प्रकरणातील दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या घटनेतील मृत महिलेचा वापर करून सरपंच संतोष देशमुख यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेल्याचा आरोप आहे. त्यामुळे अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.