वरकमाईचा मोह आला अंगलट; ४ हजारांची लाच घेताना ३१ वर्षीय तलाठी एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:08 IST2025-05-06T15:07:57+5:302025-05-06T15:08:11+5:30
एसीबीचे पथक तलाठ्याच्या धाराशिव येथील आणि मूळ गाव शिरसाव येथील घराची झडती घेत आहे.

वरकमाईचा मोह आला अंगलट; ४ हजारांची लाच घेताना ३१ वर्षीय तलाठी एसीबीच्या जाळ्यात
धाराशिव : कुळाचे नाव कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्थळ पाहणी अहवाल आणि पंचनाम्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ४ हजार रुपये स्वीकारताना वाघोली येथील तलाठी व खासगी लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. ही कार्यवाही सोमवारी दुपारी करण्यात आली.
धाराशिव तालुक्यातील तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतातील कुळाचे नाव कमी करून देण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करण्यात आला होता. या अर्जाच्या अनुषंगाने तहसीलदारांनी मंडळ अधिकाऱ्यांना स्थळ पाहणी आणि पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंडळ अधिकाऱ्यांनी वाघोली सज्जाचे तलाठी भूषण वशिष्ठ चोबे यांना हा अहवाल देण्यास सूचित केले. तक्रारदार तरुण यासाठी पाठपुरावा करीत असताना, सोमवारी तलाठी चोबे याने खासगी लिपिक भारत शंकर मगर याच्यामार्फत ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ४ हजार रुपयांची लाच निश्चित करण्यात आली. दरम्यान, सोमवारी संबंधित तरुणाने या प्रकाराची लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. यानंतर, उपाधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांनी लाच मागणीची पडताळणी केली. त्यात तथ्य आढळून आल्यानंतर त्यांनी कर्मचारी नेताजी अनपट, आशिष पाटील, नागेश शेरकर यांच्या साहाय्याने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे खासगी लिपिकाच्या माध्यमातून ४ हजार रुपयांची लाच स्विकारताना तलाठी चोबे आणि लिपिकास पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरकमाईचा मोह आला अंगलट
लाच प्रकरणात अडकलेला तलाठी भूषण चोबे हा अवघ्या ३१ वर्षाचा आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच वरकमाईचा मोह त्याच्या अंगलट आला. एसीबीचे पथक त्याच्या धाराशिव येथील आणि मूळ गाव शिरसाव येथील घराची झडती घेत आहे.