क्रूरता! बार्शीच्या वादग्रस्त डॉक्टरने गर्भवती महिलेला जबरदस्तीने गोळी दिली, गर्भपात घडवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 18:37 IST2025-10-16T18:30:19+5:302025-10-16T18:37:36+5:30
आधी चालकाची आत्महत्या, आता गर्भपात! डॉक्टर अडकतो वारंवार वादाच्या भोवऱ्यात

क्रूरता! बार्शीच्या वादग्रस्त डॉक्टरने गर्भवती महिलेला जबरदस्तीने गोळी दिली, गर्भपात घडवला
- संतोष वीर
भूम (धाराशिव): नात्यांमधील विश्वास आणि वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना भूम तालुक्यातील ढगे चिंचपुर येथे उघडकीस आली आहे. बार्शी येथील डॉक्टर नंदकुमार रामलिंगप्पा स्वामी यांनी आपल्या शेतावर काम करणाऱ्या वाशी तालुक्यातील एका गर्भवती महिलेला जबरदस्तीने गोळी खाण्यास दिल्यामुळे तिचा गर्भपात झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात डॉक्टर स्वामींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
फिर्यादी महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, ढगे चिंचपुर येथील डॉक्टर स्वामी यांच्या शेतात फिर्यादी महिला बांधकाम करण्यासाठी गेली होती. ती गर्भवती असल्याचे माहीत असतानाही, १२ ते १३ ऑक्टोबर दरम्यान डॉक्टर स्वामी यांनी तिला जबरदस्तीने शेतात उभ्या असलेल्या गाडीत नेले. तिथे गाडीतील मशीनने तपासणी करून त्यांनी महिलेला गर्भपाताची गोळी खाण्यास दिली. या गोळीमुळे महिलेच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि तिला रक्तस्राव होऊन तिचा गर्भपात झाला. एका निष्पाप जीवाचा बळी घेणाऱ्या या क्रूर कृत्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
गर्भ पुरल्याचा धक्कादायक प्रकार, पतीला मारहाण
या घटनेनंतर फिर्यादी महिलेच्या पतीने ते मृत अर्भक डॉक्टर स्वामी यांच्या शेतात पुरले. मात्र, 'अर्भक शेतात का पुरले?' असे म्हणत डॉक्टर स्वामींनी फिर्यादी महिलेच्या पतीला मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. महिलेच्या तक्रारीवरून १५ ऑक्टोबर रोजी डॉक्टर स्वामींविरुद्ध भारतीय कायद्याच्या कलम ८९, २३८, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
डॉक्टरांवर यापूर्वीही गंभीर गुन्हे
आरोपी डॉक्टर नंदकुमार स्वामी हे सातत्याने वादग्रस्त ठरले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या गाडीवरील भूम येथील चालक फय्याज पठाण यांनी स्वामी यांच्या मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी पठाण यांनी मोबाईलवर व्हिडिओ बनवून हे सत्य उघड केले होते. त्यावेळी स्वामी फरार झाले होते आणि त्यांना शोधमोहीम राबवून अटक करण्यात आली होती. अशा गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने हा नवा गुन्हा केल्याने नागरिक हादरले आहेत.