- संतोष वीरभूम (धाराशिव): तालुक्यातील साडेसांघवी गावास अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गावाजवळील बाणगंगा नदीला पूर आला होता. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या शेतकरी, ग्रामस्थांच्या घरात तसेच गोठ्यांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडेसांघवी येथे भेट दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेत नुकसानग्रस्तांना धीर दिला. तसेच अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून मदतकार्यात गती द्यावी, असे स्पष्ट आदेश दिले. नुकसानग्रस्त कुटुंबांना खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किटचे वाटप शिंदे यांनी केले. गावातील पशुधनालाही याचा मोठा फटका बसला असून येथील प्रकाश देवकते यांच्या ६ शेळ्या, अशोक पाटील यांच्या ३ गायी व ४ शेळ्या, ज्ञानेश्वर डोंबले यांचे १२ जनावरे वाहून गेली आहेत. तर अशोक पाटील यांच्या तब्बल १५ गायी, १० शेळ्या यासह २५ घरांचे नुकसान झाले होते. या सर्व नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चिंता करू नका, राज्य सरकार शेतकऱ्यांचे आहे, घाबरण्याचे काहीही कारण नाही असे म्हणत धीर दिला.
पूरामुळे झालेल्या या दुर्घटनेने गावातील शेतकरी व नागरिक हतबल झाले असून, शासनाच्या तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक,आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार तानाजी सावंत, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे,झाकीर सौदागर,नागनाथ नाईकवाडी,भूम शिवसेना तालुका अध्यक्ष बालाजी गुंजाळ,सत्यवान गपाट,निलेश शेळवणे,युवराज हुंबे,प्रवीण देशमुख,विशाल ढगे,समाधान सातव,विशाल अंधारे,निलेश चव्हाण,रामकिसन गव्हाणे,दत्ता नलवडे,श्रीहरी दवंडे, दत्तात्रय गायकवाड,सुभाष देवकते,अतुल शेळके,उद्धव सस्ते,बालाजी डोके आदींची उपस्थिती होती.