सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:38 IST2021-08-17T04:38:01+5:302021-08-17T04:38:01+5:30
उस्मानाबाद : यंदा जून व जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. पिके जोमदार आली ...

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?
उस्मानाबाद : यंदा जून व जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. पिके जोमदार आली असतानाच मागील २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने ५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
मे महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. जून महिन्यात अधूनमधून पाऊस हजेरी लावत राहिला. त्यामुळे बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ५ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या सर्वाधिक ३ लाख ६३ हजार १२३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा झाला आहे, तूर ६० हजार १९१ हेक्टर, उडीद ४९ हजार ५१८ हेक्टर, मुगाची १८ हजार ९०३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. कापसाची २ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. पिके बहरली असतानाच मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे पिके माना टाकू लागली आहेत. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे. असे शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करुन पिके जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. सर्वांनी एकाच वेळी पाणी देण्यास सुरुवात केल्याने विजेचा वापर वाढला आहे. परिणामी शेतीपंपास कमी दाबाने वीजपुरवठा होऊ लागला आहे.अतिरिक्त भार वाढल्याने रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे.
पीकनिहाय क्षेत्र क्षेत्रफळमध्ये
ज्वारी २,८०७
सोयाबीन ३,७०,२६२
तूर ६२,६२०
मूग १९,३२६
उडीद ५२,४६४
जून महिन्यात पाऊस झाल्यानंतर दोन एकर क्षेत्रावर सोयाबीन लागवड केली. पिके जोमात आली असतानाच पावसाने पाठ फिरविली आहे. पिकांनी माना टाकल्या आहेत.
अशोक मनसुके, शेतकरी
पाच एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली आहे. पिके चांगली आली होती; मात्र पावसाने उघडीप दिल्याने पिके करपू लागली आहेत. पाऊस न झाल्यास पिके जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सागर भोंग, शेतकरी
कोट...
पावसाने उघडीप दिल्याने हलक्या जमिनीवरील सोयाबीन, उडीद, मूग माना टाकू लागले आहे. पावसाचा खंड पडल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. पिकांचे सॅम्पल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बी. यू. बिराजदार, प्रभारी कृषी अधीक्षक कृषी अधिकारी