वाळू वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ८ हजार लाच घेताना तहसीलदारांचा चालक जाळ्यात
By चेतनकुमार धनुरे | Updated: December 20, 2023 13:20 IST2023-12-20T13:18:34+5:302023-12-20T13:20:37+5:30
वाळू वाहतूक सुरळीत सुरु ठेवण्यासाठी व कारवाई होवू न देण्यासाठी घेतली लाच

वाळू वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ८ हजार लाच घेताना तहसीलदारांचा चालक जाळ्यात
धाराशिव : कळंब तहसीलदारांच्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत असलेल्या एकाने वाळू वाहतूक सरळीत चालू देण्यासाठी वाहन धारकाकडून लाच घेतल्याचा प्रकार कळंब येथे घडला आहे. मंथली ८ हजार रुपये ठरवून ते स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी या चालकास रंगेहात ताब्यात घेतले.
मूळचे लोहारा येथील असलेले अनिल शिवराम सुरवसे हे सध्या कळंब येथील तहसीलदारांच्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वाळूची वाहतूक करणाऱ्या कळंब तालुक्यातील एका व्यक्तीकडे वाळू वाहतूक सुरळीत सुरु ठेवण्यासाठी व कारवाई होवू न देण्यासाठी प्रत्येक महिन्याला १५ हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम प्रति महिना ८ हजार रुपये इतकी ठरली. मात्र, वाळू वाहतूक करणाऱ्या व्यक्तीने ही लाच द्यावयाची नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर उपाधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांच्या सूचनेनुसार लाचलुचपतच्या पथकाने बुधवारी दुपारी कळंब येथे सापळा रचला. यावेळी ठरलेली ८ हजारांची लाच स्विकारताना तहसीलदारांचा चालक अनिल सुरवसे हा या पथकाच्या जाळ्यात रंगेहात अडकला. त्यास ताब्यात घेऊन कळंब ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.