तानाजी सावंतांची मंत्रीपदाची हॅट् ट्रिक हुकली; का हुकले मंत्रिपद ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 19:53 IST2024-12-16T19:53:13+5:302024-12-16T19:53:47+5:30
मंत्रिपद मिळू शकले नसले तरी त्यांच्याकडे इतर महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा

तानाजी सावंतांची मंत्रीपदाची हॅट् ट्रिक हुकली; का हुकले मंत्रिपद ?
धाराशिव : परंडा मतदारसंघातून अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत काठावर उत्तीर्ण झालेले माजी मंत्री तानाजी सावंत यांना यावेळच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही. मंत्री असूनही संघटन वाढविण्यात ते अपयशी ठरल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू आहे.
शिंदेसेनेचे प्रमुख नेते राहिलेले तानाजी सावंत यांनी पक्षातील बंडाच्या वेळी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्याचे फळ त्यांना सत्तेत येताच मंत्रिपदाच्या रूपाने मिळाले. त्यांनी आपल्या पदाला न्याय देण्यासाठी महाआरोग्य शिबिर, माता सुरक्षित तर घर सुरक्षित यासह तरुण, बालकांसाठी अभिनव उपक्रम राबवले. मात्र, त्याहून त्यांची बेधडक वक्तव्ये, भ्रष्टाचाराचे आरोप जास्त चर्चेत राहिले. शिवाय, संघटनवाढीत फारसे योगदान राहिले नसल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे. मंत्रिपद मिळू शकले नसले तरी त्यांच्याकडे इतर महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांत आहे.
का हुकले मंत्रिपद ?
१. आरोग्यमंत्री असताना झालेले भ्रष्टाचाराचे आरोप
२. काठावर जिंकलेली निवडणूक
३. जिल्ह्यातील इतर दोनही सहकाऱ्यांचा झालेला पराभव
४. बेधडक केली जाणारी विधाने
५. भाजप व अजित पवार गटाचा सुप्त विरोध