उस्मानाबादच्या दोन पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 15:14 IST2020-09-14T15:12:14+5:302020-09-14T15:14:31+5:30
वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता वर्षभरापासून रजेवर होते

उस्मानाबादच्या दोन पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई
उस्मानाबाद : तुळजापूर व उमरगा येथून उस्मानाबाद पोलीस मुख्यालयामध्ये बदली केल्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता वर्षभरापासून रजेवर असलेल्या दोन पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांनी केली.
तुळजापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश चाटे व उमरग्याचे पोनि. एस. आर. ठोंबरे यांची १ नोव्हेंबर २०१९ रोजी उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती. यानंतर हे दोघेही रूजू होऊन लागलीच वैद्यकीय रजेवर निघून गेले. रजेवर जाताना त्यांनी कुठल्याही स्वरूपाचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले नव्हते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून त्यांना वेळोवेळी नोटिसा देऊन रूजू होण्याबाबत कळविण्यात आले. परंतु, संबंधित दोघेही रूजू झाले नाहीत. त्यामुळे प्रसन्ना यांनी दोघांवर निलंबनाची कारवाई केली. याबाबत पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांनीही निलंबनाची कारवाई झाली असल्याचे सांगितले.