रायगव्हाण जोडकालव्याचे सर्वेक्षण मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:47+5:302021-07-18T04:23:47+5:30

कळंब : लासरा बॅरेज ते रायगव्हाण प्रकल्प या जोडकालव्याची व्याप्ती वाढत असल्याने सुधारित सर्वेक्षण व अन्वेषण यास हिरवा कंदील ...

The survey of Raigavan Jodkalava will be completed | रायगव्हाण जोडकालव्याचे सर्वेक्षण मार्गी लागणार

रायगव्हाण जोडकालव्याचे सर्वेक्षण मार्गी लागणार

कळंब : लासरा बॅरेज ते रायगव्हाण प्रकल्प या जोडकालव्याची व्याप्ती वाढत असल्याने सुधारित सर्वेक्षण व अन्वेषण यास हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी निविदा प्रक्रिया होऊन गुंडाळला गेलेला हा प्रकल्प पुन्हा रुळावर येत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी एक्सेस होत असल्याने पुढे नदीवर १५ उच्च पातळी बंधारे (बॅरेज) बांधण्यात आले आहेत. यातील पहिला बॅरेज हा कळंब तालुक्यातील लासरा शिवारात आहे. एकूण तीन दलघमी साठवण क्षमता असलेला हा उच्च पातळी बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यामधून ११.५३ दलघमी पाणी एक्सेस होते. असे असताना १० किमी अंतरावरील १२.७०१ दलघमी क्षमतेचा रायगव्हाण प्रकल्प मात्र सातत्याने तहानलेला असतो. यामुळेच मांजरा ओव्हरफ्लो झाल्यानंतर एक्सेस होणारे पाणी जोडकालव्याच्या माध्यमातून रायगव्हाणमध्ये टाकणाऱ्या योजनेस मंजुरी मिळाली होती. मात्र, याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पच गुंडाळण्यात आला होता. तद्नंतर मागच्या वर्षभरापासून हा विषय पुन्हा नव्याने अजेंड्यावर आला होता. यासाठी बंद पाईपलाईनचा पर्याय समोर ठेवत सर्वेक्षणाचा विचार समोर आला होता. दरम्यान, या दोन्ही प्रकल्पाच्या अधेमधे येणाऱ्या गावातील व लगतच्या शिवारातील अस्तित्वातील स्थापित साठवण क्षेत्रात पाणी वळते करावे, अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांनी केली होती. यानंतर वाढणारी व्याप्ती व सर्व्हेसाठी तुटपुंजी तरतूद असा विषय समोर आला होता.

दरम्यान, गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना जलसंपदा विभागाच्या अवर सचिवांनी नुकतेच एक पत्र दिले असून, यात लासरा ते रायगव्हाण प्रकल्पात पाणी टाकण्याच्या योजनेची व्याप्ती वाढल्याने पूर्वीच्या उर्वरित रक्कमेतून सर्वेक्षण करणे उचित होणार नाही. यामुळे महामंडळाकडील सर्वेक्षण कामाकरिता उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून लासरा ते रायगव्हाण जोडकालव्याचे सर्वेक्षण व अन्वेषण करावे, असे सूचित केले आहे. यामुळे याचे विस्तृत सर्वेक्षण मार्गी लागणार आहे.

चौकट...........

कसे आहे स्वरूप, काय आहे मागणी?

दहा किमी अंतराच्या प्रस्तावित कालव्यासाठी सर्वेक्षण होणार आहे. यात एक्सेस ११.५३ दलघमी पाण्यापैकी ७ दलघमी पाणी रायगव्हाणमध्ये तर ४.५३ दलघमी पाणी रायगव्हाण, ताडगाव, घारगाव, जायफळ, लासरा, रांजणी येथील पाझर तलाव, लघू तलाव, बंधारे यात वळते करण्याचा अंतर्भाव करावा, अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांनी जूनमध्ये राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन केली होती. याशिवाय कार्यकारी अभियंता इलियास चिश्ती यांच्यासमवेत उस्मानाबाद येथे बैठक घेतली होती.

Web Title: The survey of Raigavan Jodkalava will be completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.