कर्जवसुलीसाठी बँकेचा शेतकऱ्यांमागील तगादा थांबवा, अन्यथा आंदोलन; भाजपाचा इशारा
By चेतनकुमार धनुरे | Updated: March 21, 2023 18:44 IST2023-03-21T18:43:39+5:302023-03-21T18:44:01+5:30
सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून, अवकाळी आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कर्जवसुलीसाठी बँकेचा शेतकऱ्यांमागील तगादा थांबवा, अन्यथा आंदोलन; भाजपाचा इशारा
धाराशिव : केवळ कागदपत्रावर नवे-जुने होणारी प्रक्रिया जिल्हा बँकेने बदललेली आहे. यावर्षी संपूर्ण रक्कम भरुनच ही प्रक्रिया केली जात असून, वसुलीसाठी बँक व सोसायट्यांनी शेतकऱ्यांमागे लावलेला तगादा थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मंगळवारी भाजपकडून देण्यात आला आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन हे प्रकरण कानी घातले. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रत्यक्ष शेतकरी कर्जदारास कर्ज व व्याजाची रक्कम भरूनच कर्ज प्रकरण नवे-जुने करावे, असा जुलुमी नियम यावेळी घातला आहे. सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून, अवकाळी आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकाएकी एवढी रक्कम शेतकऱ्यांना भरणे अवघड आहे. रक्कम भरुनही कर्ज प्रकरण दाखल केले तर कर्ज मिळेल, याची बँक शाश्वती देत नाही. या विषयात लक्ष घालून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त व्याज भरून घेऊन शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरण नवे-जुने करण्याच्या सूचना बँकेस देण्यात याव्यात, अशी विनंती जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली. वसुलीचा तगादा नाही थांबवल्यास भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी भाजपा किसान मोर्चा पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे, तालुकाध्यक्ष नानासाहेब कदम, युवराज नळे, बालाजी गावडे, नवनाथ कांबळे, मोहन खापरे, काका शेळके, संतोष आगलावे व पदाधिकारी उपस्थित होते.