सोयाबीन पिकावर गोगलगायीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:23+5:302021-07-18T04:23:23+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला पाऊस झाला. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या; परंतु अशातच पावसाने उघडीप दिल्याने काही ...

सोयाबीन पिकावर गोगलगायीचा हल्ला
उस्मानाबाद : जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला पाऊस झाला. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या; परंतु अशातच पावसाने उघडीप दिल्याने काही भागामध्ये सोयाबीन पिकांवर पैसा व गोगलगायीने हल्ला चढविला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
मे महिन्यात बहुतांश भागात मान्सूनपूर्व पाऊस झाला. शिवाय जून महिन्यात पाऊस हजेरी लावत राहिला.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. १२ जुलैपर्यंत ४ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी ९५ इतकी आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली. पावसामुळे पिकाची उगवणही चांगली झाली. सोयाबीन पीक जोमात आले असतानाच आता पिकावर पैसा व गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ही कीड निशाचर असून फक्त रात्रीच्या वेळीच पिकांना नुकसान करतात. दिवसा त्या जमिनीमध्ये किंवा बांधावर लपून राहतात. मिलीपीड ही जमिनीवर आढळणारी पिकांना नुकसानकारक कीड म्हणून ओळखली जाते. ही कीड सोयाबीन, कपाशी इत्यादीचे बियाणे फस्त करुन फक्त टरफल शिल्लक ठेवते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतात तूट दिसून येत आहे. त्याचबरोबर तूट लावलेल्या जागेवरचे बियाणेसुद्धा खाऊन टाकत आहे. बियाणे उगवणीनंतर रोपावस्थेत पानासहीत संपूर्ण रोप खाऊन टाकत असून तसेच बांधावरील व शेतातील तणांवरसुद्धा ही किड आढळून येत आहे. पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी विभागाच्या वतीने कीड नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती केली जात आहे.
किडीच्या व्यवस्थापनासाठी हे करा
काेळपणी व शेत तणविरहित ठेवावे.
शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग करुन ठेवावेत किंवा गवताच्या ढिगाच्या ऐवजी बारदाणे सुतळी पोते, १० लिटर पाण्यात एक किलो गूळ टाकून भिजवून पसरवून ठेवावा. सकाळी गवताच्या ढिगाखाली किंवा बारदाण्याखाली जमा झालेल्या किडी गोळा करुन मिठाच्या द्रावणात किंवा कपडे धुण्याच्या सोड्याच्या द्रावणात, कीटकनाशकाच्या द्रावणात टाकून माराव्यात. चांगला पाऊस झाल्यानंतर पैसा कीड नियंत्रणात येते.
कोट...
पैसा व गोगलगायचा पिकांवरील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी २ किलो ज्वारीचा भरडा करून ५० मिली ५ टक्के फिप्रोनील कीटकनाशक त्यामध्ये मिसळून प्रभावग्रस्त पिकांच्या ओळीमध्ये फेकावे. हा भरडा पक्षी व पाळीव प्राणी खाणार नाहीत. याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी. पैसा किडीकरिता लॅम्डा रायलोथ्रिन १५ मिली प्रति १० लिटर पाण्यांमध्ये पिकांवर फवारणी करावी. गोगलगायकरिता मेटाअल्डीहाईड २ किलोग्रॅम गोळ्या एकर शेतात फेकाव्यात.
उमेश घाटगे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी