पैसे लांबविणारे सहाजण जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:26 IST2021-01-13T05:26:17+5:302021-01-13T05:26:17+5:30
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील एका पेट्रोल पंपावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास ६ तरुण एका कारने दाखल झाले. येथे त्यांनी वाहनात ...

पैसे लांबविणारे सहाजण जाळ्यात
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील एका पेट्रोल पंपावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास ६ तरुण एका कारने दाखल झाले. येथे त्यांनी वाहनात इंधन भरुन घेतल्यानंतर स्वाईप मशिनने पैसे भरण्याचा बहाणा करीत पंपावरील कर्मचारी प्रवीण गायकवाड यांच्याकडून ही मशिन ताब्यात घेतली. नंतर काही तरुणांनी प्रवीण यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. याच काळात एका तरुणाने पैसे भरण्याऐवजी उलट त्यातूनच रिव्हर्स ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून खात्यातील १० हजार रुपये लांबविले व तेथून सर्वांनीच पोबारा केला. हा फसवणुकीचा प्रकार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लक्षात आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नळदुर्ग पोलिसांनी पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत कारचे वर्णन बिनतारी संदेश यंत्रणेने जिल्हाभर प्रसारित केले. दरम्यान, दुपारी संबंधित वर्णनाची कार ही तुळजापूर-नळदुर्ग रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत उभी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी धाव घेऊन कार ताब्यात घेत विजय धोंडीराम सुर्यवंशी, नितीन आनंद भिडे, आशपाक दस्तगीर शेख, सोहम लक्ष्मीकांत पाटील, ज्ञानेश्वर गंजेराम नरोडे, सचिन भाऊलाल पाटील यांना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी नाशिक येथील असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.