शिवभक्तांनो...महाराज तुमच्याकडेच बघतायत; धाराशिवच्या कलाकाराने साकारली शिवरायांची ‘बोलकी’ नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:55 IST2026-02-18T17:54:27+5:302026-02-18T17:55:50+5:30
तुम्ही ज्या कोनातून शिल्पाकडे पाहाल, त्या कोनातून महाराज तुमच्याकडे पाहत असल्याचा भास निर्माण होतो.

शिवभक्तांनो...महाराज तुमच्याकडेच बघतायत; धाराशिवच्या कलाकाराने साकारली शिवरायांची ‘बोलकी’ नजर
धाराशिव: तुम्ही डावीकडे जा किंवा उजवीकडे... तुम्ही खाली झुकून पहा किंवा वर पाहा... छत्रपती शिवाजी महाराजांची तीक्ष्ण आणि तेजस्वी नजर सतत तुमच्यावरच खिळलेली आहे, असा भास झाला तर? हा कोणताही चमत्कार नसून धाराशिवच्या एका जिद्दी कलाकाराच्या अडीच वर्षांच्या तपस्येचे फळ आहे.
शहरातील ‘कलायोगी’ राजकुमार कुंभार यांनी शिवरायांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त एक अशी अद्भुत शिल्पाकृती साकारली आहे, जी पाहणाऱ्यांचे डोळे दिपवून टाकते आणि मेंदूला विचार करायला लावते. हे शिल्प तांत्रिकदृष्ट्या ‘टू-डी’ प्रकारात असूनही ‘थ्री-डी’ असल्याचा हुबेहूब भास निर्माण करते. या शिल्पाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची ‘हलती नजर.’ प्रेक्षक ज्या कोनातून या शिल्पाकडे पाहतो, त्याच कोनातून महाराज आपल्याकडे पाहत आहेत, असा भास निर्माण होतो. हा ‘ऑप्टिकल इल्यूजन’चा प्रयोग यशस्वी करण्यासाठी राजकुमार यांनी अडीच वर्षे सतत प्रयत्न केले.
जिद्द आणि अभ्यासाची सांगड
हे शिल्प साकारण्यापूर्वी कुंभार यांनी देश-विदेशातील संग्रहालयांत असलेल्या शिवरायांच्या अस्सल चित्रांचा सखोल अभ्यास केला. यासाठी प्रथम मातीपासून हुबेहूब हस्तकलेत शिल्प घडवून त्यावर रबर व पीओपी साचे तयार करण्यात आले. त्यानंतर मिळालेल्या प्रतीवर रंगकाम करून आजची ही देखणी कलाकृती साकारली. २८ जानेवारीला मातीकामापासून सुरू झालेला हा प्रवास १६ फेब्रुवारीला रंगकामासह पूर्ण झाला.
विक्रमाच्या दिशेने वाटचाल
राजकुमार कुंभार यांच्या नावावर आधीच १६ विक्रमांची नोंद आहे. आता हे ‘टू-डी’ स्वरूपातील जगातील पहिलेच ‘थ्री-डी’ फिरती नजर असलेले शिल्प म्हणून जागतिक स्तरावर नोंदवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, शिल्पकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना केवळ अंगभूत कला आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे.
जातीने कुंभार असलो तरी शिल्पकलेचे औपचारिक शिक्षण मिळाले नाही. मात्र, प्रचंड आवड आणि इच्छाशक्तीच्या जोरावर हा प्रयोग यशस्वी केला आहे. - राजकुमार कुंभार