शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:36 IST2021-08-24T04:36:46+5:302021-08-24T04:36:46+5:30
उस्मानाबाद : कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुले घरातच बसून आहेत. दरम्यान, घरात राहून त्यांना ...

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले
उस्मानाबाद : कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुले घरातच बसून आहेत. दरम्यान, घरात राहून त्यांना कंटाळा असल्याने खोडकरपणा, हट्टी स्वभाव, चिडचिडेपणा वाढला आहे. याचा परिणाम पालकांच्या मानसिक आरोग्यावरही पडला आहे.
कोरोना काळात प्राथमिक शाळा बंद होत्या. या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने घेतला जात आहे. त्यामुळे मुलांच्या हाती मोबाईल, टॅब आला. मुले अभ्यास झाल्यानंतरही तासनतास मोबाईल हाती घेऊन गेम, कार्टून पाहत बसत आहेत. पालकांनी मोबाईल घेतल्यानंतर चिडचिडेपणा वाढत आहे. मुलांना समजावण्यात पालकांनाही कसरत करावी लागत आहे. त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही पडत असल्याचे दिसून येते.
मुलांच्या समस्या
मागील दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुले घरी खाणे, झोपणे, मोबाईलवर गेम खेळणे यातच गुंतून आहेत.
शरीराची हालचाल नसल्यामुळे वजन वाढले आहे.
मुले फिरायला जाण्याचा पालकांना अट्टहास करतात. मात्र, कोरोना काळात मनोरंजनात्मक कार्यक्रम बंद होते.
मुले हट्टी झाल्याने त्यांच्यात चिडचिडेपणा वाढला आहे.
पालकांच्या समस्या
मुलांच्या शिक्षणाकरिता पालकांनी महागडे मोबाईल खरेदी करुन दिले. मात्र, मुले व्हिडीओ गेम व कार्टून पाहण्यात व्यस्त असल्याने पालक त्रस्त झाले आहेत.
कामाच्या व्यापामुळे अनेक पालकांना घरातील वृध्द व्यक्ती व लहान मुलांना वेळ देता येत नसल्याने त्यांच्या आरोग्याची चिंता लागली असल्याने मानसिक आरोग्यात बिघाड झाला आहे.
वर्क फ्रॉम होम मुळे पालकांचे दैनंदिन वेळापत्रक ही बदलले आहे.
आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याने गृह कल ही वाढत आहे.
मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...
शाळा बंद असल्याने मुलांसह पालकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. शारीरिक स्वास्थ ठेवण्यासाठी मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यासाठी सकस आहार, व्यायाम, पुरेशी झोप घेणे, मित्र, मैत्रिणींशी संवाद ठेवणे, नेहमी नातेवाईक व कुटुंबाशी संवाद साधत राहणे गरजेचे आहे.
डॉ. महेश कानडे, मानसोपचार तज्ज्ञ
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सकस आहाराकडे लक्ष दिले पाहिजे, व्यायाम करणे गरजचे आहे. तसेच पालकांनी मुलांना रात्री झोपण्यापू्र्वी मोबाईल देऊ नये, ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी वेळापत्रक ठरवून मोबाईल हाताळण्यास द्यावा.
डॉ. राजेश नरवडे, मानसोपचार तज्ज्ञ