एस. टी. महामंडळाचाचा श्रावणात शिमगा; कर्मचाऱ्यांना ७ तारखेला पगार मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST2021-08-17T04:37:54+5:302021-08-17T04:37:54+5:30
गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. संसर्ग वाढल्यानंतर यातील सहा महिने बससेवा बंदच होती तर उर्वरित ...

एस. टी. महामंडळाचाचा श्रावणात शिमगा; कर्मचाऱ्यांना ७ तारखेला पगार मिळेना
गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. संसर्ग वाढल्यानंतर यातील सहा महिने बससेवा बंदच होती तर उर्वरित काळात जीव धोक्यात घालून एस.टी.चे चालक, वाहक इतर कर्मचारी सेवा बजावत आहेत. कोरोना संसर्गामुळे एस.टी.च्या उत्पादनात घट झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारास काही महिने विलंब झाला होता. मात्र, पुन्हा पगारी वेळेवर होत होत्या. मागील महिन्यापासून महिन्याच्या १५ ते २० तारखेला पगार मिळत आहे. ऑगस्ट महिन्याचा पगार १६ तारखी उलटली तरी पगार मिळालेला नाही. पगारास विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांना उसनवारीवर घरप्रपंच चालवावा लागत आहे.
उसनवारी तरी किती करायची
एस.टी.ची बससेवा बंद होती. त्यामुळे घरीच बसून राहावे लागले. जून महिन्यापासून बस सुरू झाली असल्याने दिलासा मिळाला आहे. पगार महिन्याच्या १ ते ७ तारखेदरम्यान होणे अपेक्षित आहे. मात्र, महिन्याची १५ तारीख उलटली तरी पगार मिळेना झाला.
एक चालक
पगारावरच मुलांचे शिक्षण, दवाखान, घरखर्च भागतो. पगार वेळेवर होत नसल्याने इतरांकडून हातउसने पैसे घेऊन साहित्य खरेदी करावे लागत आहे. ७ तारखेला पगार होणे गरजेचे आहे.
एक वाहक
उत्पन्न कमी खर्च जास्त
राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरळीत सुरू आहे. मात्र, प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद नाही. सहा आगारांत एकूण ४२२ बसेस असून, यापैकी ३२० बसेस धावत आहेत.
उस्मानाबाद आगाराच्या ७६ बसेस धावत आहेत. त्यातून आगारास ७ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. डिझेल खर्च ६ लाख ५० हजार व पेमेंटसाठी प्रतिदिन ३ लाख ५० हजार खर्च करावा लागतो. त्यामुळे आगाराचा खर्च हा उत्पन्नापेक्षा अधिक आहे. १ किलोमीटरमागे २८ रुपयांचा तोटा एस.टी.ला बसतोय.
राज्य परिवहन महामंडळाच्या वर्ग एक ते वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या १ ते ७ तारखेपर्यंत होणे गरजेचे असते. उस्मानाबाद विभागातील पावणेतीन हजार कर्मचाऱ्यांचे पगारास विलंब होत आहे. याबाबत विभाग नियंत्रक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. संपर्क होऊ शकला नाही.