पावसाने सडला कांदा, शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 17:56 IST2020-09-27T17:55:10+5:302020-09-27T17:56:04+5:30
सततच्या पावसामुळे भूम तालुक्यातील जेजला शिवारात लागवड केलेल्या दीडशे हेक्टर क्षेत्रातील कांदा पीक धोक्यात आले आहे. अतिपावसामुळे कांद्याचे पीक सडले असून रबीसाठी तयार केलेली रोपेही या पावसामुळे जळून गेल्याने आता नविन लागवडीसाठी मोठीच अडचण निर्माण झाली आहे.

पावसाने सडला कांदा, शेतकरी त्रस्त
पाथरुड : सततच्या पावसामुळे भूम तालुक्यातील जेजला शिवारात लागवड केलेल्या दीडशे हेक्टर क्षेत्रातील कांदा पीक धोक्यात आले आहे. अतिपावसामुळे कांद्याचे पीक सडले असून रबीसाठी तयार केलेली रोपेही या पावसामुळे जळून गेल्याने आता नविन लागवडीसाठी मोठीच अडचण निर्माण झाली आहे.
भूम तालुक्यातील जेजला येथील जवळपास ७० टक्के शेतकरी दरवर्षी खरीप व रबी हंगामात कांद्याची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेतात. त्यामुळे कांद्याचे कोठार म्हणून तालुक्यात जेजला गावची ओळख आहे. जेजला येथील एकूण ८४७ हेक्टर क्षेत्रापैकी ३५० ते ४०० हेक्टर म्हणजेच जवळपास ७० टक्के क्षेत्रावर खरीप, रबी हंगामात कांद्याचे पीक घेतले जाते. मात्र, यावर्षी सुरुवातीपासूनच सतत पाऊस पडत असल्याने व गेल्या १५ दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने खरीप हंगामात जुलै, ऑगस्ट महिन्यात लागवड केलेला जवळपास १५० हेक्टरवरील कांद्यासह रबी हंगामात जवळपास २५० हेक्टर लागवड होणाऱ्या कांद्याची रोपे पावसाने सडून गेली. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
त्यातच कांदा बियाणाचे दर प्रतीकिलो ३ हजार ५०० रूपयांवर गेल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. उडीद काढणीनंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. परंतु यावर्षी रोपेच वाया गेल्याने अनेक शेतकऱ्यांना कांद्याऐवजी ज्वारी, गहू, हरभरा या रबी हंगामातील पिकांचा पर्याय शोधावा लागणार आहे.