ओबीसीच्या उन्नतीसाठी रोहिणी आयोगाची अंमलबजावणी हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:49+5:302021-07-18T04:23:49+5:30

उस्मानाबाद : ओबीसी प्रवर्गासाठी असलेल्या सवलतींचा लाभ काही ठरावीक जातींनाच मिळत आहे. त्यामुळे मूळ आणि खऱ्या ओबीसींवर अन्याय होत ...

The Rohini Commission should be implemented for the upliftment of OBCs | ओबीसीच्या उन्नतीसाठी रोहिणी आयोगाची अंमलबजावणी हवी

ओबीसीच्या उन्नतीसाठी रोहिणी आयोगाची अंमलबजावणी हवी

उस्मानाबाद : ओबीसी प्रवर्गासाठी असलेल्या सवलतींचा लाभ काही ठरावीक जातींनाच मिळत आहे. त्यामुळे मूळ आणि खऱ्या ओबीसींवर अन्याय होत आहे. हे टाळण्यासाठी बारा बलुतेदार, आलुतेदार व भटके विमुक्त यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नतीसाठी रोहिणी आयोगाची त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी बारा बलुतेदार महासंघ, प्रजालोकशाही परिषदेचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केली आहे. बारा बलुतेदार महासंघ, प्रजालोकशाही परिषदेच्या वतीने उस्मानाबाद येथे शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना कल्याणराव दळे म्हणाले, केंद्र सरकारने ओबीसींसाठी न्या. रोहिणी आयोग गठित केला होता; परंतु या आयोगास अनेक वेळा मुदतवाढ दिल्यामुळे ओबीसी समाजाला न्याय्य हक्क मिळण्यासाठी विलंब होत आहे. केंद्र सरकार यावर्षी जनगणना करणार आहे. त्यात देशभरातील ओबीसी समाजासह सर्व जाती- जमातींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली, तसेच राज्यात मराठा, ओबीसी आरक्षणाचा विषय गाजत आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करावे, मराठा समाजाचा ओबीसी जातीमध्ये समावेश करू नये, राजकीय गणित समोर ठेवून न्या. रोहिणी आयोगास सतत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आरोप केला. या मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही दळे यांनी दिला. यावेळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे, बंजारा समाजाचे प्रदेशाध्यक्ष संदेश चव्हाण, गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत गवळी, ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, गुरव समाजाचे अध्यक्ष प्रताप गुरव आदींची उपस्थिती होती.

चौकट......

ओबीसी आरक्षणात अन्य जाती नकोत

यापुढे ओबीसी आरक्षणामध्ये अन्य कुठल्याही जातीचा समावेश करू नये. न्या. जी. रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी राज्यभर एक कोटी स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. महाज्योती ही नावापुरती अमलात आली. सारथीने एक हजार कोटींची मागणी केली. या अनुषंगाने महाज्योतीस तीन हजार कोटींचा भरीव निधी द्यावा. त्यातील दोन हजार कोटी मायक्रो ओबीसींसाठी राखीव ठेवावा. ओबीसींचा नोकऱ्यात असलेला १ लाख १८ हजारांचा बॅकलॉग त्वरित भरून काढावा, अशी मागणी कल्याणराव दळे यांनी केली.

चौकट....

जातनिहाय जनगणना हवी

ओबीसींच्या उन्नतीसाठी जातनिहाय जनगणना हवी. यावर्षी केंद्र सरकार जनगणना करणार आहे. ही वेळ चुकली, तर ओबीसींचे काही खरे नाही. जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला अर्थच नाही. मुस्लीम ओबीसींची सर्वच पक्षाने फसवणूक केली आहे. आमची आरक्षणाची मागणी नाही. कायद्यात तशी तरतूदही नाही. ओबीसींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी तरुणवर्गाने पुढे येऊन संघर्ष करावा व सत्ता बदल घडवून आणावा. तेव्हाच हे शक्य होईल, असे मत शब्बीर अन्सारी यांनी व्यक्त केले.

चौकट......

बारा बलुतेदार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष हंबिरे

बारा बलुतेदार महासंघ, प्रजालोकशाही परिषदेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी संतोष हंबिरे यांची एकमताने निवड झाली. त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी दिले. महासंघाच्या शनिवारी झालेल्या चिंतन मेळाव्यात ही निवड करण्यात आली, तसेच महासंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन दळे यांच्या हस्ते करण्यात आले. हंबिरे यांचा निवडीनंतर सत्कार करण्यात आला.

Web Title: The Rohini Commission should be implemented for the upliftment of OBCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.