फिरण्यासाठी गेलेल्या शिक्षकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:37 IST2021-08-24T04:37:14+5:302021-08-24T04:37:14+5:30

उमरगा : शहराजवळील जकेकूर परिसरातील एमआयडीसीमध्ये रविवारी सायंकाळी फिरण्यासाठी गेलेल्या एका शिक्षकास दोघा चोरट्यांनी मारहाण करून एक लाखाचा ऐवज ...

Robbed the teacher who went for a walk | फिरण्यासाठी गेलेल्या शिक्षकाला लुटले

फिरण्यासाठी गेलेल्या शिक्षकाला लुटले

उमरगा : शहराजवळील जकेकूर परिसरातील एमआयडीसीमध्ये रविवारी सायंकाळी फिरण्यासाठी गेलेल्या एका शिक्षकास दोघा चोरट्यांनी मारहाण करून एक लाखाचा ऐवज लुटल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सोमवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील औराद येथील रहिवासी व हल्ली कुटुंबीयांसह जकेकूरवाडी येथे वास्तव्यास असलेले प्रल्हाद दत्तुपंत काळे हे मुरूम येथे खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाल्याने त्यानंतरच्या धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांनी त्यांचे भाऊ मालाजी, राजेंद्र व मित्र बालाजी आष्टे यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये रोख रक्कम घेतली होती. त्यापैकी नव्वद हजार रुपये धार्मिक कार्यक्रमात खर्च करून उर्वरित पन्नास हजार रुपये पॅन्टच्या वॉच पॉकीटमध्ये ठेवले होते. ही रक्कम सोबत घेऊन रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ते जकेकूर परिसरातील औद्योगिक वसाहतीमध्ये फिरण्यासाठी गेले होते. यावेळी विना नंबरच्या दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांनी त्यांना ‘तुम्ही कुठून आलात, तुमच्याकडे खूप पैसे आहेत’, असे म्हणून खिशांची तपासणी सुरू केली. यावेळी शिक्षक काळे व त्या दोन भामट्यांमध्ये झटापट झाली. त्या दोघांनी त्यांना खड्ड्यात पाडले व उजव्या हातातील दोन बोटांतील सोन्याच्या दोन अंगठ्या काढू लागले. यावेळी शिक्षक काळे यांनी एकाला चावा घेतला असता हत्याराचा धाक दाखवून हाताच्या बोटातील दीड तोळे वजनाच्या व ४५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, वॉच पाकीटमधील रोख पन्नास हजार रुपये, दोन हजार रुपये किमतीचा साधा मोबाईल असा एकूण ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेऊन दुचाकीवरून हे चोरटे लातूरच्या दिशेने फरार झाले. या प्रकरणी प्रल्हाद काळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव अधिक तपास करीत आहेत.

चौकट.....

वसाहत परिसर पुन्हा चर्चेत...

येथील औद्योगिक वसाहतीमध्ये पहाटे व सायंकाळी उमरगा शहरासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत असतात. या लूटमारीच्या घटनेने नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जकेकूर चौररस्त्यालगत असलेल्या या औद्योगिक वसाहतीत अनेक अवैद्य धंदे चालू असल्याच्या चर्चेनंतर आता या लूटमारीच्या घटनेने औद्योगिक वसाहत परत एकदा चर्चेचे केंद्र ठरली आहे.

Web Title: Robbed the teacher who went for a walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.