‘प्राथमिकचे वर्गही आता सुरू करा’
लोहारा : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद होती, परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे शासनाने हळूहळू नियमात बदल करत शाळा, महाविद्यालये सुरू केली आहेत. सुरुवातीला नववी ते बारावी व आता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत, परंतु पहिली ते चौथीचे वर्ग अद्यापही बंद आहेत. त्यामुळे हे वर्गही सुरू करावेत, अशी मागणी पालकांमधून होत आहे.
पाण्याअभावी होतेय प्रवाशांची गैरसोय
लोहारा : शहरातील बस स्थानकात बसेस पूर्ववत सुरू झाल्या असून, प्रवाशाची गर्दीही वाढत आहे, परंतु स्थानकात प्रवाशांना पिण्यासासाठी पाणी नसल्याने गैरसोय होत आहे. अनेकदा प्रवाशांना आजूबाजूच्या हॉटेलमधील पाण्यावर किंवा विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन प्रवाशाच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी प्रवाशांतून करण्यात येत आहे.
फलक नसल्याने अपघाताचा धोका
लोहारा : लोहारा ते उंडरगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी वळण रस्ते आहेत, परंतु या ठिकाणी संबंधित विभागाकडून दिशादर्शक फलक बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे येथे अपघाताचा धोका वाढला आहे. अनेकदा वळणावर समोरून येणारे वाहन नजरेस पडत नसल्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याची दखल घेऊन आवश्यक ठिकाणी फलक बसवावेत, अशी मागणी वाहनधारक, प्रवाशांमधून केली जात आहे.