लग्नकार्यासाठी निर्बंध शिथिल, तरीही मंगलकार्यालयांना सोहळ्यांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST2021-08-18T04:38:37+5:302021-08-18T04:38:37+5:30
कळंब : अनलॉक २ मध्ये शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असले, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून, लग्न समारंभातील ...

लग्नकार्यासाठी निर्बंध शिथिल, तरीही मंगलकार्यालयांना सोहळ्यांची प्रतीक्षा
कळंब : अनलॉक २ मध्ये शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असले, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून, लग्न समारंभातील उपस्थिती १०० व २०० अशी मर्यादित ठेवली आहे. यामुळे मोठे विवाह सोहळे सध्या पार पडू शकणार नाहीत. त्यामुळे या सोहळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मंगल कार्यालय चालकापासून ते घोडेवाल्यापर्यंत मंडळींचे हे निर्बंध शिथिल केल्यानंतरही ‘अच्छे दिन’ येणार नसल्याचे चित्र आहे.
कोरोनाचे संकट अजून कायम आहे. संभाव्य तिसरी लाट आणि शेजारील बीड जिल्ह्यात डेल्टा प्लसचा रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने ११ ऑगस्ट रोजी नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये विवाह समारंभासाठी काही बंधने घालून दिली आहेत. त्यामुळे वधू-वरांकडील मंडळींना, तसेच या समारंभाच्या व्यवस्थेत असणाऱ्या प्रत्येक घटकाला या नियमांच्या अधिन राहून हा सोहळा पार पाडावा लागणार आहे.
प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीत वधू-वरांकडील मंडळींनी मास्क वापरणे, वऱ्हाडी मंडळीसाठी सॅनिटायजरची सोय करणे, सुरक्षित अंतर राखणे या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे. मंगल कार्यालय व्यवस्थापक, भोजन व्यवस्थापक, बँडचालक, भटजी, फोटोग्राफर या मंडळींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झाले असले पाहिजेत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
सध्या निर्बंध शिथिल केल्याने या व पुढील महिन्यात असलेल्या शुभ तारखांना काही लग्न समारंभ पार पडतील, अशी मंगल कार्यालय चालकांना अपेक्षा होती. मात्र, या दोन महिन्यांत एकही तारीख अजून बुक झाली नसल्याने, हा सिझनही कोरडा जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. केटरर्स, बँड पथक, भटजी, फोटोग्राफर व इतर मंडळीनाही यामुळे रोजगार उपलब्ध होणार नसल्याने चिंता वाढली आहे.
चौकट -
लग्न समारंभासाठी या आहेत अटी -
मंगल कार्यालय
मंगल कार्यालयात लग्न समारंभासाठी कार्यालयाच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीतजास्त १०० लोकांना परवानगी दिली आहे. या ठिकाणी कोविड नियमाचे पालन सक्तीचे करण्यात आले आहे. यापेक्षा जास्त लोकांची गर्दी होऊ नये, याची खबरदारी बाळगण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
लॉन्स
लॉन्स म्हणजे उघड्या मैदानात लग्न समारंभ असेल, तर लॉन्सच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीतजास्त २०० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणीही कोविडचे नियम कायम राहणार आहेत.
चौकट -
वरातीच्या सूचना नाहीत
लग्न समारंभातील महत्त्वाचा भाग असणाऱ्या वरातीच्या संदर्भात शासनाने काहीच सूचना नियमावलीत दिल्या नाहीत. त्यामुळे पारावर नवरदेव नेताना बँडबाजासहित घोड्यावर बसवून मिरवत न्यायचा का, याचा खुलासा होऊ शकला नाही. त्यामुळे लग्नात बँड, घोडा याचे नियोजन करायचे की नाही, हा प्रश्नही उभा ठाकतो आहे. प्रशासनाने मोर्चा, रॅलीला ५० लोकांची मर्यादा ठेवली आहे, मग नवरदेवही ५० लोकांच्या मिरवणुकीत पारावर घेऊन गेले तर चालेल, असेही काही जणांचे म्हणणे आहे.
चौकट -
मंगलकार्यालय चालकांची चिंता कायम
प्रशासनाने निर्बंध शिथिल केले, तरी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये केवळ दोन तीन तारखा बुक होतील. दिवाळीत कोविड नियम आणखी शिथिल होतील, कोरोनाचा प्रभाव कमी होईल, अशी आशा असल्याने अनेकांनी दिवाळीच्या तारखाबाबत चौकशी केली आहे.
- समीर देशपांडे, मंगल कार्यालय चालक
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात बुकिंगला प्रतिसाद कमी आहे. कोरोना निर्बंध सध्या शिथिल असल्याने, २०० लोकांना मंगल कार्यात सहभागी होता येत आहे. ही परिस्थिती कायम राहिली, तर दिवाळीत बुकिंग मोठ्या प्रमाणात होतील, अशी अपेक्षा आहे.
- नाना सोमासे, व्यवस्थापक, मंगल कार्यलय
चौकट -
लग्नाच्या तारखा -
ऑगस्ट महिन्यात २०, २१, २५, २६ व २७ तर सप्टेंबर मध्ये १, ८, १६ व १७ या तारखांना विवाह मुहूर्त आहेत.
चौकट -
बँडला परवानगी द्या
मागील २ वर्षांपासून बँडबाजावर उपजीविका करणारी कुटुंबे उपासमारीला तोंड देत आहेत. शासनाच्या नियमावलीत बँडचा उल्लेखच नसल्याने विवाह कार्यात किंवा इतर कार्यात बँड लावला जात नाही. माझ्याकडे सध्या ३० जणांचा बँडचा संघ आहे. त्यांनी काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाने द्यावे, तसेच बँडला परवानगी द्यावी.
- कमलाकर कसबे, बँडचालक, मोहा.
लग्न कार्यात आता अनेक बंधने आहेत. नवरदेव पारावर घेऊन जाण्यासाठी घोड्याची मोठी मागणी असे, पण मागील दोन वर्षांत लग्न कार्ये कोरोनाने अनेक परंपरांना फाटा देऊन उरकले जात आहेत. त्यामुळे आमच्या व्यवसायाला फटका बसला आहे. घोडा सांभाळण्यासाठी महिन्याकाठी किमान ६-७ हजारांचा खर्च आहे व उत्पन्न काहीच नाही. आगामी सिझनमध्ये तरी परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- हाजू मुंडे, घोडा मालक, खामसवाडी.
चौकट -
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सणवार मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे या कालावधीत लग्न कार्ये सहसा कोणी करत नाहीत. दिवाळीनंतर अनेकांनी लग्नासाठी तिथीची विचारणा केली आहे. निर्बंध आणखी शिथिल झाले, तर यंदा मंगल कार्ये मोठ्या प्रमाणात होतील.
- मनोज जोशी, पुरोहित.