आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल
उस्मानाबाद : शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यावर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
बेंबळी येथील धनंजय मुंगळे यांनी २१ जानेवारीला मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात आंदोलन करून अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला होता. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार सुनील डोईबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनंजय मुंगळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
४०५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेच्या वतीने धडक मोहीम राबविली जात आहे. गुरुवारी जिल्ह्यातील विविध मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४०५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाया केल्या. या वाहनचालकांकडून ८९ हजार ४०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नियम मोडणाऱ्यावर यापुढेही कारवाया केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली.
जुन्या भांडणावरून एकास मारहाण
उस्मानाबाद : जुन्या भांडणाच्या कारणावरून एकास दोघांनी बेदम मारहाण केली. ही घटना कळंब तालुक्यातील वाघोली येथे १९ जानेवारी रोजी घडली. वाघोली येथील राजेंद्र कांबळे व रामा कांबळे यांनी गावातीलच जयराम कानगे यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कानगे यांनी दिलेल्या फिर्यादकरून उपरोक्त दोघांविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहेेे.