२८९ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाया
उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने धडक मोहीम राबविली जात आहे. मंगळवारी जिल्ह्यातील विविध मार्गांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २८९ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वाहनचालकांकडून ६१ हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली.
बालकाच्या भांडणावरून दाम्पत्यास मारहाण
उस्मानाबाद : बालकाच्या भांडणावरून दाम्पत्यास बेदम मारहाण झाली. ही घटना उमरगा तालुक्यातील विठ्ठल साखर कारखाना येथे १२ जानेवारी रोजी घडली.
नामदेव चौरे आपल्या पत्नीसह घरी थांबले होते. गावातीलच शिवाजी फुंदे याने आपल्या कुटुंबीयांसमवेत तेथे येऊन भांडणाचा वाद उकरून काढत चौरे दाम्पत्यास काठीने मारहाण केली. मुरूम ठाण्यात नामदेव चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला. घटनेचा अधिक तपास मुरूम पोलीस करीत आहेत.
दारू अड्ड्यावर धाड एकाविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील इटकूर येथील अवैध दारू अड्ड्यावर कळंब पोलीस ठाण्याच्या पथकाने १२ जानेवारी रोजी धाड टाकली. यात इटकूर येथील जयश्री शिंदे यांच्याजवळ १८ लिटर अवैध गावठी दारू आढळून आली. पोलिसांनी मद्य जप्त करून संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद केला.