महावितरणच्या कारभाराविरोधात आंदोलक चढला झाडावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 07:16 PM2021-11-10T19:16:55+5:302021-11-10T19:19:38+5:30

सक्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरण कार्यालयासमोर जोरदार आंदोलन सुरु असताना एक आंदोलक झाडावर चढल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. 

Protesters climb tree against MSEDCL | महावितरणच्या कारभाराविरोधात आंदोलक चढला झाडावर

महावितरणच्या कारभाराविरोधात आंदोलक चढला झाडावर

googlenewsNext

कळंब ( उस्मानाबाद ) : सक्तीची वीजबिल वसुली बंद करावी,डीपी साठी घेण्यात येणारे नियमबाह्य पैसे घेण्यात येऊ नयेत आदी मागण्यांसाठी कळंब येथील महावितरण कार्यालयासमोर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जोरदार आंदोलन केले. यातील एक आंदोलक झाडावर चढल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

कळंब तालुक्यात सध्या महावितरणच्यावतीने वीजबिल वसुली चालू आहे. जळालेले शेतीसाठीचे रोहित्र बदलण्यास महावितरण कडून टाळाटाळ केली जात आहे. रोहित्र बदलण्यासाठी, दुरुस्तीसाठी, वाहतूकीसाठी अशी कारणे  दाखवून शेतकऱ्यांना पैसे मागितले जात असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेने केला. अतिवृष्टीने अनेक ठिकाणचे रोहित्र जळाले आहे, काही नादुरुस्त झाले आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी महावितरणकडे मागणी केली की बिल भरा, रोहित्रचे पैसे भरा असे अधिकारी सांगतात. अतिवृष्टीने आधीच शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर आता रब्बीची पेरणी करण्याच्या तयारीत शेतकरीवर्ग आहे. शासनाने अजून पुरेशी मदत दिली नसताना आहे ती  तुटपुंजी रक्कम खर्च करून शेतकरीवर्ग पेरणी करीत असताना महावितरणची ही भूमिका  आडमुठेपणाची असल्याचे यावेळी स्वाभिमानी संघटनेने म्हटले.

याबाबत संघटनेच्यावतीने महावितरणला देण्यात आले. संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान संघटनेचा कळंब तालुक्यातील शिराढोण येथील कार्यकर्ता रमजान शेख हा महावितरण कार्यालयाच्या झाडावर चढला. मागण्या मान्य झाल्याशिवाय खाली उतरणार नाही, अशी भूमिका शेख याने घेतली. आंदोलन सुरु होऊनही बराच वेळ महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला नाही. त्यामुळे आंदोलनकर्ते संतप्त झाले होते. पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी याप्रकरणी आंदोलनकर्ते व महावितरणच्या अधिकाऱ्यात चर्चा घडवून आणली.त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कमलाकर पवार, सचिन टेळे, विष्णू काळे, अजय शिंदे, चंद्रकांत समुद्रे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.

Web Title: Protesters climb tree against MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.